पत्रकारांनी संघटित होऊन वर्तमान व भविष्य सुरक्षित करावे,  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई-कोकण विभागाच्या १६ व्या पत्रकार विचारमंथन, सन्मान व आय-कार्ड वितरण सोहळ्यात मान्यवरांचे प्रतिपादन
1 min read

पत्रकारांनी संघटित होऊन वर्तमान व भविष्य सुरक्षित करावे, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई-कोकण विभागाच्या १६ व्या पत्रकार विचारमंथन, सन्मान व आय-कार्ड वितरण सोहळ्यात मान्यवरांचे प्रतिपादन

Loading

पत्रकारांनी संघटित होऊन वर्तमान व भविष्य सुरक्षित करावे

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई-कोकण विभागाच्या १६ व्या पत्रकार विचारमंथन, सन्मान व आय-कार्ड वितरण सोहळ्यात मान्यवरांचे प्रतिपादन

अकोला प्रतिनिधी : पत्रकारांनी समाजातील अन्याय, अनैतिक प्रवृत्ती आणि अनुचित घटनांना वाचा फोडल्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले, धमक्या तसेच विविध योजनांमधील आर्थिक लाभांपासून पत्रकारांना वंचित ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे पत्रकारांची मोठी कुचंबना होत आहे. अशा परिस्थितीत हतबल पत्रकार आणि अन्यायग्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने संघटित होणे गरजेचे आहे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सक्षम नेतृत्वासोबत राहून पत्रकारांनी आपले वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावे, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी तथा प्रयोगशील शैक्षणिक सेवाव्रती प्रकाश अंधारे, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख (निंबेकर) यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी केले.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई व कोकण विभागाचा १६ वा पत्रकार विचारमंथन, सन्मान, मार्गदर्शन तथा आय-कार्ड वितरण समारंभ दादर येथील विदर्भ वैभव मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी मान्यवरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सखोल विचारमंथन करून पत्रकारांनी संघटितपणे आपल्या हक्कांसाठी आणि समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा तसेच विविध महापुरुषांना वंदन व अभिवादन करण्यात आले. देशासाठी बलिदान देणारे शहीद जवान, आत्महत्याग्रस्त शेतकरी, अत्याचारग्रस्त महिला व इतर बळी, दिवंगत पत्रकार, आपत्ती व अपघातातील मृत्यूमुखी पडलेले नागरिक तसेच माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी व पद्मश्री स्व. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नव्या सभासदांना आय-कार्डचे वितरण

कार्यक्रमात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नवीन सभासदांना अधिकृत आय-कार्डचे वितरण करण्यात आले. उपस्थित प्रमुख अतिथी व मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. संघटनेच्या कार्यासाठी स्पीकर, माईक आणि म्युझिक प्लेअर सेट भेट दिल्याबद्दल ठाणे येथील ज्येष्ठ पदाधिकारी संजय सोळंके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

शिक्षकांना पत्रकारितेसाठी परवानगी देण्याची मागणी

विचारमंथनाच्या सत्रात पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणींवर चर्चा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाच चिंतन, मनन, जनजागृती आणि समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना पत्रकारिता करण्यासाठी शासनाकडून येणाऱ्या अडचणींचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.

शिक्षकांना त्यांच्या वेळेतून वेळ काढून पत्रकारितेचा छंद आणि सामाजिक कर्तव्य जोपासता यावे, यासाठी विद्यमान निर्बंधांमध्ये योग्य ती सुधारणा करून त्यांना पत्रकारिता करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सभेत करण्यात आली. हा महत्त्वपूर्ण विषय शासन दरबारी मांडण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख (निंबेकर) यांनी दिले.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश अंधारे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबईतील शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट) दापोली विधानसभा संपर्कप्रमुख प्रवीण लाड, उद्योजक व समाजसेवी सुभाष कांबळी उपस्थित होते. तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख (निंबेकर), राष्ट्रीय पदाधिकारी तथा कादंबरीकार पुष्पराज गावंडे, कोकण प्रभारी जगदिश प्रसाद करोतिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रवीण लाड, दैनिक नवशक्तीचे नितीन बोंबाळे आणि जगदिश प्रसाद करोतिया यांनी संघटनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचे कौतुक केले. पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्व पत्रकारांनी एकदिलाने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

पत्रकारांचा मोठा सहभाग

कार्यक्रमाला कोकण पदाधिकारी विनोद चाळके, महाराष्ट्र संघटन प्रमुख व मंत्रालयीन सचिव रफिक मुलानी, ठाणे जिल्हा संघटक संजय सोळंके, पालघर जिल्हा सचिव संतोष घरत, तसेच जयप्रकाश जयस्वाल, देवेंद्र मेश्राम, नितीन बोंबाळे, उमेश चौधरी, अजय शिगवण, रविंद्र सर्णेकर, कमलेश कुबल, विकास भोसले, संदीप गोवेकर यांच्यासह मुंबई, कोकण व परिसरातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तसेच सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे व्यवस्थापन विनोद चाळके यांनी केले. रफिक मुलानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. पत्रकारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक न्याय, जनजागृती आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी पत्रकारांनी एकजुटीने काम करण्याचा संदेश या संपूर्ण कार्यक्रमातून देण्यात आला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *