ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप पुढील टप्प्यात ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार
![]()
ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार
डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
पुढील टप्प्यात ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार
अमळनेर प्रतिनिधी : आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे ‘ज्ञानदीप अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध शाळांमध्ये जाऊन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला साहित्य तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून, १,००० विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या मनात शिक्षणाची आवड, आत्मविश्वास आणि भविष्यात मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा निर्माण करणे हा ज्ञानदीप अभियानाचा उद्देश आहे.
*पुढील टप्प्यात ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार*
ज्ञानदीप अभियानाला दीर्घकालीन स्वरूप देत अमळनेर व पारोळा तालुक्यातील गरजू व होतकरू ५० विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय डी. एल. सोशल फाउंडेशनने घेतला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेनुसार त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे. या सामाजिक उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका भावना मैराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक महेश संदानशिव, रिझवान मणियार, महेंद्र ढमाळ, मनोज मैराळे आणि कृष्णा निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.
“एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे” या ब्रीदवाक्याने सुरू असलेल्या या अभियानातून १,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला ज्ञानदीप आता आणखी ५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला उजेड देणार आहे, असा विश्वास फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.



