गुणवत्तेच्या प्रवासाला पीएचडीची कोंदण; प्रा. नितीन पवारांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास  ,दहावीपासून विद्यापीठापर्यंत अव्वल कामगिरी; २०२० मध्ये गोल्ड मेडल, आता डॉक्टरेट पदवी
1 min read

गुणवत्तेच्या प्रवासाला पीएचडीची कोंदण; प्रा. नितीन पवारांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास ,दहावीपासून विद्यापीठापर्यंत अव्वल कामगिरी; २०२० मध्ये गोल्ड मेडल, आता डॉक्टरेट पदवी

Loading

गुणवत्तेच्या प्रवासाला पीएचडीची कोंदण; प्रा. नितीन पवारांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास

दहावीपासून विद्यापीठापर्यंत अव्वल कामगिरी; २०२० मध्ये गोल्ड मेडल, आता डॉक्टरेट पदवी

अमळनेर प्रतिनिधी :
शासकीय तंत्रनिकेतनच्या संगणक विभागातील प्राध्यापक नितीन भागवत पवार यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सेज युनिव्हर्सिटी, इंदूर यांच्याकडून त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक क्षेत्रात त्यांनी केलेले संशोधन विशेष उल्लेखनीय ठरले असून, त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. पवार यांनी “Design a Hybrid Model for Brain Tumor Classification and Prediction of Survival Rate Using Deep Learning” या अत्यंत आधुनिक व संशोधनात्मक विषयावर अभ्यास केला. डॉ. हेमांग श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन पूर्ण करून प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला. डीप लर्निंगच्या माध्यमातून ब्रेन ट्युमरचे वर्गीकरण तसेच रुग्णांच्या सर्व्हायवल रेटचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

गुणवत्तेच्या शैक्षणिक प्रवासाला पीएचडीची कोंदण

प्रा. नितीन पवार यांचा शैक्षणिक प्रवास सुरुवातीपासूनच गुणवत्तापूर्ण राहिला आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे, ता. अमळनेर येथे झाले. दहावीच्या परीक्षेत त्यांनी संस्थेतून द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर प्रताप कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना इलेक्ट्रॉनिक्स विषयात विशेष प्रावीण्यासह नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक मिळविण्याचा बहुमान त्यांनी संपादन केला.

यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी शाखेत द्वितीय विद्यापीठ क्रमांक मिळविला. तसेच डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथेही त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

एम.टेक.मध्ये विद्यापीठात प्रथम; २०२० मध्ये सुवर्णपदक

प्रा. पवार यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणखी एक मानाचा शिक्का उमटला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातून एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) पदवी घेताना. विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी २०२० मध्ये सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. सातत्यपूर्ण गुणवत्ता, कठोर परिश्रम आणि तंत्रज्ञानातील सखोल अभ्यास यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

एमपीएससीतून राजपत्रित अधिकारी; शासकीय सेवेतही उल्लेखनीय कामगिरी

प्रा. पवार यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवातही तितकीच उल्लेखनीय आहे. २००९ सालची एमपीएससी सरळसेवा परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अधिव्याख्याता म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. राजपत्रित अधिकारी वर्ग-१ श्रेणीतील या पदावर कार्यरत असताना त्यांनी शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी टेक महिंद्रा, पुणे येथे ज्युनियर डेव्हलपर म्हणून काम केले. त्यानंतर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही त्यांनी अध्यापनाची जबाबदारी सांभाळली.

गुरुजनांच्या संस्कारांचे यशात मोठे योगदान

आपल्या या यशाचे श्रेय प्रा. पवार यांनी आई-वडील, पत्नी तसेच शालेय जीवनातील गुरुजनांना दिले आहे. शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे येथील गुरुजनांसह श्री. पंडित गंगाराम पवार (काका), श्री. शांताराम अभिमन पाटील (मामा) आणि कळमसरे येथील ज्ञानदीप क्लासेसचे संचालक तथा
माध्यमिक शिक्षक श्री. ईश्वर महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या जडणघडणीत लाभले.
शालेय जीवनापासूनच अभ्यासू आणि गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या प्रा. पवार यांनी आपल्या यशामागे मिळालेल्या संस्कारांचा आणि मार्गदर्शनाचा आवर्जून गौरव केला आहे.

शासकीय तंत्रनिकेतनच्या सहकाऱ्यांचेही योगदान

पीएचडीच्या या यशासाठी संस्थेतील डॉ. पी. एम. पाटील, डॉ. पी. पी. चौधरी तसेच इतर अधिकारी व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे प्रा. पवार यांनी नमूद केले आहे. अध्यापन, संशोधन आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या यांचा समतोल साधत त्यांनी पीएचडीची शैक्षणिक वाटचाल पूर्ण केली.

कळमसरे ते पीएचडीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

प्रा. नितीन पवार हे शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक श्री. बी. जी. पवार यांचे सुपुत्र असून पंचायत समिती एरंडोलचे माजी सभापती श्री. भगवान छगन पाटील (बोरखेडा, ता. धरणगाव) यांचे जावई आहेत. त्यांचे मूळ गाव पढावद, ता. शिंदखेडा असून त्यांच्या पीएचडी पदवीच्या यशामुळे गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुणवत्तेची कास धरत शालेय शिक्षणापासून विद्यापीठातील गुणवत्तेपर्यंत, सुवर्णपदकापासून राजपत्रित अधिकारी पदापर्यंत आणि आता पीएचडीपर्यंतचा त्यांचा प्रवास विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
प्रा. नितीन भागवत पवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *