अमळनेरकरांचा अंत बघू नका; दोन-चार दिवसांत पाणी प्रश्न न सुटल्यास पालिकेवर मोर्चा धडकणार* *टेंडरचा हव्यास, सोशल मीडियावर नौटंकीसह पाणी वाटपातील भेदभाव…* *पाणी द्यायला नगरपरिषद अपयशी; रील्स बनवण्यात मात्र पुढे! दळभद्री कारभारावर ठाकूरांचा घणाघात!*
![]()
अमळनेरकरांचा अंत बघू नका; दोन-चार दिवसांत पाणी प्रश्न न सुटल्यास पालिकेवर मोर्चा धडकणार*
*टेंडरचा हव्यास, सोशल मीडियावर नौटंकीसह पाणी वाटपातील भेदभाव…*
*पाणी द्यायला नगरपरिषद अपयशी; रील्स बनवण्यात मात्र पुढे! दळभद्री कारभारावर ठाकूरांचा घणाघात!*
अमळनेर प्रतिनिधी
३१ जुलै रोजी आलेल्या पुरात केवळ मोजून दोन ते तीन पाईप वाहून गेले होते. ते तात्पुरते जोडून नागरिकांना तत्काळ दिलासा देणे सहज शक्य होते. मात्र, टेंडरचा हव्यास, मलिदा लाटण्याची वृत्ती आणि पैसा कुठून व कसा काढता येईल या दृष्टिकोनातून काम जाणीवपूर्वक लांबवण्यात आले. अमळनेरकरांना मूलभूत आणि जीवनावश्यक अशा पाण्यापासून वंचित ठेवणे हा पालिकेचा अक्षम्य दळभद्रीपणा आहे. नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती, पाणीपुरवठा अभियंता आणि पालिका प्रशासनाने अमळनेरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये; येत्या दोन ते चार दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पालिकेवर थेट जनमोर्चा धडकवला जाईल, असा सज्जड इशारा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
अमळनेर शहरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागरिक एक-एक थेंबासाठी तडफडत आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अमळनेर शहरात २७ ते २८ जुलै दरम्यान आलेले पाणी त्यानंतर थेट रखडले असून आज २० ऑगस्ट उजाडला तरी जनता पाण्यासाठी वणवण करत आहे. असे असताना पालिका पदाधिकारी आणि प्रशासन सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ आणि रील्स अपलोड करून बोटं दाखवत ‘काम युद्धपातळीवर सुरू आहे’ अशी स्वतःचीच फुशारकी मारून लोकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांची अशी उघड्या डोळ्यांनी टिंगलटवाळी करताना यांना लाजा कशा वाटत नाहीत? कौडीची अक्कल नसताना सोशल मीडियावर नौटंकी सुरू आहे. जर खरंच युद्धपातळीवर काम करायचे होते, तर तिथे २५-३० मजुरांऐवजी १०० मजूर लावून दिवस-रात्र एक करत अवघ्या आठ दिवसांत पाईपलाईन का जोडली गेली नाही? नागरिकांच्या पैशांवर चालणाऱ्या पालिकेला अतिरिक्त मजूर लावून काम उरकण्याचे गांभीर्य का वाटले नाही? लाखो सोडून करोडो रुपये लागले असते तर नागरीकांनी नगरपरिषदेला पैशांचा हिशोब मुळीच विचारला नसता असा संतप्त सवाल ठाकूर यांनी केला आहे.
*पाणी वाटपात उघड, उघड पक्षपात*
बायपास लाईनवरून शहरात सुरू असलेल्या पाणीवाटपातील पक्षपातावर ताशेरे ओढताना ठाकूर म्हणाले, “काही भागात दररोज १५ मिनिटे पाणी मिळते, तर बहुतांश सर्वसामान्य भागांत गेल्या १५-२० दिवसांत पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. रोज पाणी मिळणारे काय पालिकेचे जावई लागतात का आणि बाकीचे अमळनेरकर तुमचे दुष्मन आहेत का?” पाईपलाईन जोडल्यानंतरही टाक्या भरून रोटेशन पद्धतीने पाणी देण्यास काही भागात २२ दिवस, काहींना २५, २८ दिवस तर काहींना महिना उलटून जाईल.
*पालिकेने अमळनेरकरांना टँकरद्वारे मोफत पाणी का दिले नाही?*
शहराला पाणी पुरवणे ही पालिकेची मूलभूत आणि नैतिक जबाबदारी असताना, लाखो-करोडोंच्या कामांची टेंडर काढणाऱ्या पालिकेने टँकर अधिग्रहीत करून मोफत पाणी का पुरवले नाही? पालिकेच्या नाकर्तेपणामुळेच आज ‘जयनील फाउंडेशन’सारख्या संस्थेला पुढे येऊन स्वतःच्या खर्चाने टँकरद्वारे नागरिकांची तहान भागवावी लागत आहे, याबद्दल फाउंडेशनचे आभार मानले पाहिजेत.
*एक रुपयाही पाणीपट्टी भरू नका; वसुलीला आल्यास जाब विचारा!*


दरवर्षी १८०० रुपये पाणीपट्टी वसूल करताना पालिका प्रशासन नागरिकांकडून सक्तीने व्याजही उकळते. मात्र हक्काचे पाणी देण्याच्या वेळी पालिका सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे जोपर्यंत अमळनेरकरांना सुरळीत आणि पुरेसे पाणी मिळत नाही, तोपर्यंत नागरिकांनी पालिकेची कोणतीही पाणीपट्टी भरू नये आणि पालिकेचे पथक वसुलीसाठी आल्यास त्यांना आधी पाण्याचा जाब विचारावा, असे आवाहन ठाकूर यांनी शहरवासीयांना केले आहे.
*कोणतेही राजकारण नाही सहकार्यच..*
“पाण्याच्या गंभीर प्रश्नावर आम्ही कोणतेही राजकारण करत नाही, उलट विरोधकही या कामात सहकार्यच करत आहेत. अमळनेरची जनता अत्यंत संयमी आणि सहनशील आहे, पण त्यांच्या या सहनशीलतेला कोणी दुबळेपणा समजू नये. सतत नागरिकांचे फोन येत असल्याने हा जाब विचारावा लागत आहे. येत्या दोन ते चार दिवसांत शहराला पाणी मिळाले नाही, तर सर्व जनतेला सोबत घेऊन पालिकेवर मोर्चा काढला जाईल.”
*पाईपलाईन दुरुस्तीच्या श्रेयासाठी पुन्हा फोटोसेशनचा धडाका.?*
अमळनेर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन दुरुस्तीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले असताना, आता पाईपलाईन सुरू झाल्यानंतर मात्र उद्घाटनाचा थाट आणि फोटोसेशनची चढाओढ पाहायला मिळेल, युद्धपातळीवर काम केल्याचे दाखवून, अमळनेरच्या जनतेवर मोठा उपकार केल्याचा आव आणत सोशल मीडियावर फोटो-व्हिडिओंचा पुन्हा पाऊस पाडला जाईल.
गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी वणवण करत असताना प्रत्यक्ष कामाचा वेग वाढवण्याऐवजी आता श्रेय घेण्यासाठीची तयारी सुरू असल्याचे चित्र असल्याचा आरोप त्यांनी केला.
“जनतेला पाणी हवे आहे, उद्घाटनाचा सोहळा नाही. नागरिकांची तहान भागवणे ही पालिकेची जबाबदारी आहे; त्यासाठी फोटोसेशन करून उपकार केल्याचा आव आणण्याची गरज नाही,” असे ठाकूर यांनी सुनावले.

