जनसेवेच्या वाटेवर कर्तृत्वाची झेप! सौ. कुमुदिनी पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
![]()
जनसेवेच्या वाटेवर कर्तृत्वाची झेप! सौ. कुमुदिनी पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांच्या गावविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
धुळे येथील नगाव बारी, आकाशवाणी केंद्राजवळील कांकरिया भवन, देवपूर येथे रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले, शिव व्याख्याते सचिन देवरे यांच्या हस्ते सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांनी निंभोरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना गावात प्रभावीपणे राबविणे, नागरिकांच्या समस्या सोडविणे, विकासकामांना प्राधान्य देणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्र, मानव अधिकार संरक्षण, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती, पर्यावरण संवर्धन, शिक्षण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रफुल्ल सीताराम पाटील, प्रदेश महिला अध्यक्ष प्रा. मंदाकिनी भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल निंभोरा ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ तसेच राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


