पूराने संसार हिरावला… शिक्षिकेच्या मायेने जगण्याचा दिला नवा आधार!
![]()
अमळनेर प्रतिनिधी :
निसर्गाच्या प्रकोपाने एका क्षणात संसार उद्ध्वस्त होतो, पण अशा वेळी माणुसकीचा हात पुढे आला की दुःखाचा भार काहीसा हलका होतो. पैलाड परिसरातील मातंगवाड्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असताना के.डी गायकवाड हायस्कूलच्या शिक्षिका सौ. मंदाकिनी सुनील भोई यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या भावनेने सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
दररोज शाळेत ये-जा करतांना मातंगवाड्यातील गरिबी आणि संघर्ष त्या पाहत होत्या. मात्र ३१ जुलै रोजी आलेल्या महापुराने या कुटुंबांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले. महिलांच्या डोळ्यांतील वेदना, वाहून गेलेले संसार आणि अंगावरील ओले कपडे पाहून शिक्षिका मंदाकिनी भोई यांना अश्रू अनावर झाले.
पूरग्रस्त भगिनींचे सांत्वन करून त्या घरी परतल्या. त्यानंतर आपल्या वयोवृद्ध सासू-सासऱ्यांच्या सहकार्याने तसेच सुपुत्र गौरव आणि भूषण यांच्या मदतीने त्यांनी स्वतः भाजी-भाकरी व खिचडी तयार करून पूरग्रस्त महिलांपर्यंत पोहोचवली. “दोन घास अन्नाचे आणि दोन शब्द मायेचे” देत त्यांनी संकटग्रस्तांना धीर दिला.
इतकेच नव्हे, तर पुराच्या पाण्यात घरातील कपडे वाहून गेल्याने अनेक महिलांकडे परिधान करण्यासाठीही कपडे उरले नव्हते. ही वेदना ओळखून मंदाकिनी भोई यांनी स्वतःच्या चांगल्या प्रतीच्या साड्या पूरग्रस्त महिलांना वाटप केल्या. त्यांच्या या कृतीने मदतीपेक्षा माणुसकीचाच मोठा संदेश समाजासमोर उभा राहिला.
सौ. मंदाकिनी भोई या समाजसेवक व पक्षीमित्र तसेच अर्बन बँकेचे कॅशियर श्री. सुनील भोई यांच्या सुविद्य पत्नी आहेत. पतीच्या समाजकार्याला साथ देतानाच अनेकदा त्याही एक पाऊल पुढे टाकत सामाजिक बांधिलकी जपतात, अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
त्यांच्या या संवेदनशील कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, “शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून संकटात धावून जाणारा समाजाचा आधारवड असतो,” याची प्रचिती मंदाकिनी भोई यांच्या कृतीतून आली आहे.
या कार्याबद्दल भद्रा प्रतीक मॉल चे मालक व उद्योगपती तथा नगरसेवक प्रताप छबुलाल साळी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून, समाजाप्रती दाखविलेल्या मायेच्या आणि मानवतेच्या भावनेला मानाचा मुजरा अर्पण केला.

