समतेचा सूर… स्वराज्याचा हुंकार; देवगाव-देवळीत महामानवांच्या विचारांचा प्रेरणादायी जागर  , अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान, भाषणे आणि अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न
1 min read

समतेचा सूर… स्वराज्याचा हुंकार; देवगाव-देवळीत महामानवांच्या विचारांचा प्रेरणादायी जागर , अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान, भाषणे आणि अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Loading

समतेचा सूर… स्वराज्याचा हुंकार; देवगाव-देवळीत महामानवांच्या विचारांचा प्रेरणादायी जागर

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान, भाषणे आणि अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी :
समता युवक कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महामानवांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत १ ऑगस्ट रोजी क्रांतिसूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानांसाठी प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. डॉ. राहुल निकम, अशोक बिऱ्हाडे, गौतम बैसाणे आणि बापूराव ठाकरे हे मार्गदर्शन करत आहेत.
त्याच अनुषंगाने देवगाव येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा सखोल आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.
राजेंद्र पाटील म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या आणि लोककलेच्या माध्यमातून उपेक्षित, वंचित व कष्टकरी समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. त्यांच्या साहित्यामध्ये वास्तव जीवनाचे जिवंत चित्रण असून सामाजिक समता, स्वाभिमान, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि माणुसकीचा संदेश आहे. ‘फकिरा’सारख्या अजरामर कादंबरीतून त्यांनी अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रभावी चित्र उभे केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी आपल्या शाहिरीतून जनजागृती करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून नव्या पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे.
यानंतर लोकमान्य टिळकांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” हा बुलंद नारा देत लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली आणि देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रीती किशोर महाजन व प्रज्ञा संजय मोरे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. तर महेश्वरी किशोर महाजन, प्रणाली रविंद्र महाजन, अंकिता ज्ञानेश्वर पाटील, धनश्री जगदीश पाटील, भूमिका प्रवीण बोरसे, भूमी अनिल सोनवणे, प्रज्ञा संजय मोरे, प्रीती किशोर महाजन आणि जानवी प्रवीण बोरसे या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक मोरे तसेच महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक
रेखा अरविंद सोनवणे, राजेंद्र पांडुरंग पाटील, जितेंद्र देविदास शेटे, गायत्री हिम्मतराव पाटील, दीपक वसंतराव सोनवणे आणि कल्पना सुरेश साळुंखे उपस्थित होते. तसेच महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी यांच्यासह दोन्ही शाळांतील शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि महामानवांच्या विचारांचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *