अतिवृष्टीचा अमळनेरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम; मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत
1 min read

अतिवृष्टीचा अमळनेरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम; मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत

Loading

अतिवृष्टीचा अमळनेरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम; मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत

गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग बंद; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरात ३० जुलैच्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मोठा फटका शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. अतिवृष्टीमुळे गांधली जलशुद्धीकरण केंद्र परिसर व मुख्य पंपिंग मशिन्सजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य पंपिंग तात्पुरते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पुढील काही दिवस विस्कळीत राहणार असल्याची माहिती अमळनेर नगरपरिषदेने दिली आहे.

नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचा जोर आणि पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे बोरी नदीपात्रातील पुलाखाली असलेली ५०० मिमी सीआय (C.I.) मुख्य जलवाहिनी वाहून गेली आहे. ही जलवाहिनी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने तिच्या दुरुस्तीचे आणि पुनर्स्थापनेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

या नुकसानीमुळे कोर्ट जलकुंभ, झामी चौक, लालबाग जलकुंभ, बोरी पंप हाऊस, तांबेपुरा आणि रामवाडी जलकुंभ या भागांतील पाणीपुरवठा पुढील ८ ते १० दिवस उशिराने होणार आहे. तसेच पैलाड, मुंदडा नगर आणि लक्ष्मीनगर जलकुंभ वगळता शहरातील बहुतांश भागातही पुढील १० दिवस पाणीपुरवठा उशिराने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, साचलेल्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पंपिंग मशिन्सची तांत्रिक तपासणी व आवश्यक दुरुस्ती पूर्ण करूनच पाणी उपसा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा अत्यंत जपून व काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीचे काम सुरू असताना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व परिस्थितीबद्दल नागरिकांची गैरसोय होत असल्याबद्दल अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

ही माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटीलप्रवीणकुमार बैसाणे यांनी संयुक्तपणे जाहीर केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *