“अडकल्या चार लेकी, धावून आल्या रिता ताई; पुराच्या संकटात दिला सुरक्षिततेचा आधार”
1 min read

“अडकल्या चार लेकी, धावून आल्या रिता ताई; पुराच्या संकटात दिला सुरक्षिततेचा आधार”

Loading

“अडकल्या चार लेकी, धावून आल्या रिता ताई; पुराच्या संकटात दिला सुरक्षिततेचा आधार”

अतिवृष्टीत बंद झाले मार्ग, चार विद्यार्थिनींची झाली अडचण; स्वतःच्या वाहनातून सुरक्षित पोहोचवले खवशी गावात

अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पवार)
:मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अशा संकटाच्या काळात एका छोट्याशा मदतीने चार विद्यार्थिनींना मोठा आधार मिळाला आणि माणुसकीचे सुंदर दर्शन घडले.

खवशी येथून अमळगाव येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करतात. त्याप्रमाणे खवशी येथील कावेरी पवार, करिष्मा पवार, करीना पवार आणि प्रणिती शिरसाट या चार विद्यार्थिनी सकाळच्या बसने अमळगाव येथे शाळेसाठी दाखल झाल्या होत्या.

मात्र, अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली. त्यातच खेडी गावालगतच्या नाल्याला मोठा पूर आल्याने तसेच पिंपळी नजीकच्या नाल्यालाही पाण्याचा मोठा विसर्ग वाढल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे या चारही विद्यार्थिनी अमळगाव येथेच अडकून पडल्या.
दिवसभर त्यांनी शिक्षक व मैत्रिणींच्या मदतीने वेळ काढला; मात्र सायंकाळी घराची ओढ लागल्याने त्या अमळगाव बस स्थानकावर पोहोचल्या. परंतु सर्व मार्ग बंद असल्याने घरी जाण्याचा मार्ग त्यांना दिसत नव्हता.
याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या सौ. रिता ताई बाविस्कर या पातोंडा-अमळगाव गटातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. अमळगाव बस स्थानकावर चिंतेत उभ्या असलेल्या या विद्यार्थिनींकडे त्यांचे लक्ष गेले.

त्यांच्यासोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते विशाल सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींची चौकशी केली असता त्यांनी आपली अडचण सांगितली. तत्काळ पालकांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली.
यानंतर सौ. रिता ताई बाविस्कर यांनी स्वतःच्या वाहनातून गांधली-गडखांब-नांद्री मार्गे या चारही विद्यार्थिनींना सुरक्षितपणे खवशी गावापर्यंत पोहोचवले. संकटाच्या काळात दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.

या मदतकार्यात सामाजिक कार्यकर्ते विशाल सूर्यवंशी व ललित बाविस्कर यांनीही सहकार्य केले. अतिवृष्टीच्या संकटात विद्यार्थिनींना दिलेला हा आधार म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकीचा आदर्श असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *