बोरी नदीच्या रौद्ररूपाने अमळनेर हादरले; सखल वस्त्यांमध्ये पुराचे पाणी, जनजीवन विस्कळीत
![]()
अमळनेरमध्ये बोरी नदीला भीषण पूर; सखल भागात शिरले पाणी, जनजीवन विस्कळीत
अमळनेर प्रतिनिधी
तालुक्यात व वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर शहरातून वाहणाऱ्या बोरी नदीला गुरुवारी भीषण पूर आला आहे. पुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून, अनेक नगरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
’या’ भागांना पुराचा फटका
बोरी नदीची पातळी धोक्याच्या वर गेल्याने पुराचे पाणी भोईवाडा, मरीमाता नगर, रुबजी नगर, कसली मोहल्ला आणि वाडी चौक या सखल भागांतील वस्त्यांमध्ये वेगाने शिरले. पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसल्याने प्रचंड घबराट पसरली. घरातील संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य आणि भांडीकुंडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नगरपालिकेचे कर्मचारी मदतकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुराचे पाणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या व सखल भागातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

