गुरुपौर्णिमेनिमित्त ए. टी. झांबरे विद्यालयात ‘ज्ञानाचा सन्मान, गुरूंचा गौरव’; विद्यार्थ्यांनी साकारला भावपूर्ण आणि संस्कारमय सोहळा
![]()
गुरुपौर्णिमेनिमित्त ए. टी. झांबरे विद्यालयात ‘ज्ञानाचा सन्मान, गुरूंचा गौरव’; विद्यार्थ्यांनी साकारला भावपूर्ण आणि संस्कारमय सोहळा
जळगाव दि. २९/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्ञान, संस्कार आणि गुरू-शिष्य परंपरेचा गौरव करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रति आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करत गुरुपौर्णिमेचा सोहळा अत्यंत उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात साजरा केला.
यावर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेतील प्रत्येक वर्गाने ‘गुरूंच्या सन्मानार्थ आणि ज्ञानाच्या गौरवार्थ’ आपापल्या वर्गखोल्यांची आकर्षक आणि कलात्मक सजावट केली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर आविष्कार या वर्गसजावटीतून घडवून आणला. नैसर्गिक फुलांच्या माळा, विविध रंगांची फुले, दिवे, वाती, पणत्या तसेच विविध सजावटीच्या साहित्याचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांना मनोहारी रूप दिले. प्रत्येक वर्गाची सजावट ही केवळ आकर्षक नव्हती, तर तिच्यामागे गुरूंचा सन्मान, ज्ञानाचे महत्त्व आणि भारतीय गुरू-शिष्य परंपरेचे संस्कार यांचा सुंदर संदेश दडलेला होता.
वर्गसजावटीसोबतच विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गांमध्ये गुरूंच्या महत्त्वावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. काही वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरू-शिष्य नात्याचे महत्त्व सांगणारी नाटिका व अभिनय, तर काही ठिकाणी भाषण, नृत्य, गीत, कविता आणि गायन अशा विविध कलाविष्कारांतून आपल्या गुरुजनांप्रति आदरभाव व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना आणि भावनांना सुंदर अभिव्यक्ती देत गुरूंच्या ज्ञानदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे संपूर्ण शाळेचा परिसर गुरूभक्ती, ज्ञान आणि संस्कारांच्या भावनेने भारावून गेला होता.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये गुरू-शिष्य परंपरेविषयी आदराची भावना अधिक दृढ व्हावी आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा, यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा लोहार यांनी या उपक्रमाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेत कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने विविध उपक्रमांचे योग्य नियोजन करून ते उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
वर्गसजावटीच्या या अभिनव उपक्रमाचे परीक्षण शाळेचे माजी शिक्षक श्री. सतिश भोळे, श्री. एकनाथ पाचपांडे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वर्षा चौधरी, आणि कला शिक्षिका श्रीमती भक्ती बर्वे यांनी केले. परीक्षकांनी प्रत्येक वर्गाची सजावट, कलात्मक मांडणी, कल्पकता, विषयानुरूपता तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे बारकाईने निरीक्षण करून त्यानुसार गुणांकन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या सुंदर आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांना आकार देण्यासाठी तसेच वर्गसजावटीचे नियोजन करण्यासाठी वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. यासोबतच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गुरुपौर्णिमेचा हा सोहळा संस्मरणीय केला. प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देत या उपक्रमाला एक वेगळेच चैतन्य आणि उत्साह प्राप्त करून दिला.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ‘गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप आणि जीवनाला दिशा देणारा मार्गदर्शक’ ही भावना आपल्या कृतीतून साकारली. वर्गसजावट, नाटिका, अभिनय, नृत्य, गीत, कविता आणि गायन अशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रति व्यक्त केलेला आदर हा या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरल. त्यामुळे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील यंदाची गुरुपौर्णिमा केवळ एक उत्सव न राहता गुरूंचा गौरव, ज्ञानाचा सन्मान आणि संस्कारांची जपणूक करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.


