कवीच्या शब्दविश्वाचा संशोधकीय वेध; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितांवर प्रा. चिमकर यांची पीएच.डी.
![]()
कवीच्या शब्दविश्वाचा संशोधकीय वेध; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितांवर प्रा. चिमकर यांची पीएच.डी.
एरंडोल प्रतिनिधी :
खान्देशच्या साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या एका महत्त्वपूर्ण शैक्षणिक यशाची नोंद झाली आहे. एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक तथा अनुवादक प्रा. वा. ना. आंधळे यांच्या समृद्ध कवितांचा सखोल अभ्यास करून डी. डी. एस. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथील मराठी विभागप्रमुख प्रा. ए. टी. (आत्माराम) चिमकर यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांच्या संशोधन प्रबंधास नुकतीच मान्यता प्रदान केल्याने शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. चिमकर यांनी “कवी वा. ना. आंधळे यांच्या कवितेचा अभ्यास” हा संशोधन विषय निवडून तब्बल ३९४ पानी प्रबंध अत्यंत परिश्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी त्यांनी जिद्द, चिकाटी आणि साहित्यप्रेमाच्या बळावर हे संशोधन पूर्ण करून नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
मराठी साहित्याचा सातत्याने अभ्यास करणारे प्रा. चिमकर यांनी यापूर्वी राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, कार्यशाळा आणि परिसंवादांमध्ये विविध साहित्यविषयक संशोधन निबंध सादर करून अभ्यासक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थीप्रिय, अभ्यासू आणि संशोधननिष्ठ प्राध्यापक म्हणून त्यांची शैक्षणिक क्षेत्रात विशेष ख्याती आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तसेच शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या संशोधन कार्यासाठी डॉ. सचिन पाटील, सदस्य – मराठी अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संशोधन अधिक परिपूर्ण आणि दर्जेदार झाल्याची भावना प्रा. चिमकर यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रा. चिमकर म्हणाले, “माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या खान्देशाच्या साहित्यावर व साहित्यिकावर संशोधन करण्याचे भाग्य लाभले, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे.” त्यांच्या या कृतज्ञतेच्या भावनेतून शिक्षक, संशोधक आणि साहित्यसेवक म्हणून त्यांची व्यापक व उदात्त भूमिका अधोरेखित होते.
प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितेतील आशयवैभव, सामाजिक जाण, मानवी मूल्ये आणि साहित्यिक वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास करणारे हे संशोधन भविष्यातील संशोधकांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार असून, खान्देशच्या साहित्यविश्वाच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे.

