विचारांची रणधुमाळी’ रंगणार; बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा , तृतीय पुण्यतिथीनिमित्त साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, वक्तृत्व आणि सामाजिक जाण जागविण्याचा स्तुत्य प्रयत्न
1 min read

विचारांची रणधुमाळी’ रंगणार; बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा , तृतीय पुण्यतिथीनिमित्त साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, वक्तृत्व आणि सामाजिक जाण जागविण्याचा स्तुत्य प्रयत्न

Loading

विचारांची रणधुमाळी’ रंगणार; बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा

तृतीय पुण्यतिथीनिमित्त साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, वक्तृत्व आणि सामाजिक जाण जागविण्याचा स्तुत्य प्रयत्न

अमळनेर प्रतिनिधी :
“बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो” या राष्ट्रप्रेरणादायी ब्रीदवाक्याला साजेसा आणि विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेला नवी दिशा देणारा उपक्रम म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे लोकनेते, खानदेशची मुलुखमैदान तोफ, माजी आमदार बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त १० ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी ‘बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी वक्तृत्वकला, सामाजिक भान, इतिहासाची जाण, लोकनेत्यांच्या कार्याचा अभ्यास आणि वैचारिक नेतृत्वगुण विकसित करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांना या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन करण्यात आले असून, स्पर्धेला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्पर्धेसाठी ‘विधानसभेतील गुलाबराव’, ‘साने गुरुजींचा वैचारिक वारसा आणि साथी गुलाबराव पाटील’, ‘साथी गुलाबराव पाटील : राजकीय प्रवास’, ‘मुलुखमैदान तोफ : साथी गुलाबराव पाटील’ तसेच ‘गुलाबरावांनी केले काय? जनआंदोलनात तुरुंगात पाय’ असे अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील विषय निश्चित करण्यात आले आहेत. या विषयांमुळे विद्यार्थ्यांना लोकनेत्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करण्याची आणि स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार आहे.

इयत्ता ७ वी ते १० वी मधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. प्रत्येक विद्यालयातून जास्तीत जास्त तीन स्पर्धकांना सहभागाची संधी असून प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. वक्तृत्वाची हस्तलिखित प्रत स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सादर करणे बंधनकारक असून स्पर्धा फक्त मराठी भाषेत होणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम ₹११००, द्वितीय ₹९०० आणि तृतीय ₹७०० अशी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धकांनी ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपली नोंदणी श्री. डी. ए. धनगर सर यांच्याकडे करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासपूर्ण, प्रभावी व जबाबदार वक्तृत्वाची जडणघडण घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. हेमकांत पाटील, सचिव श्री. संदीप घोरपडे, साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजीव पाटील, सानेगुरुजी विद्यामंदिराचे श्री. सुनील पाटील तसेच सानेगुरुजी कन्या हायस्कूलच्या श्रीमती अनिता बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, “आपला उत्स्फूर्त सहभाग हीच बापूसाहेबांना खरी आदरांजली!” असा संदेश आयोजकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *