बेटी बचाओ’चा नारा अन् जन्मदाखल्यासाठी पालकांची फरफट! जबाबदार कोण?  ,   अमळनेर नगर परिषदेत कागदपत्रे हरवल्याचा आरोप; दहा महिन्यांनंतरही जन्मदाखला रखडला, पालकांची प्रशासनाकडे न्यायाची हाक
1 min read

बेटी बचाओ’चा नारा अन् जन्मदाखल्यासाठी पालकांची फरफट! जबाबदार कोण? , अमळनेर नगर परिषदेत कागदपत्रे हरवल्याचा आरोप; दहा महिन्यांनंतरही जन्मदाखला रखडला, पालकांची प्रशासनाकडे न्यायाची हाक

Loading

‘बेटी बचाओ’चा नारा अन् जन्मदाखल्यासाठी पालकांची फरफट! जबाबदार कोण?

 

अमळनेर नगर परिषदेत कागदपत्रे हरवल्याचा आरोप; दहा महिन्यांनंतरही जन्मदाखला रखडला, पालकांची प्रशासनाकडे न्यायाची हाक

अमळनेर प्रतिनिधी
शासनाकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा’ अशा विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात मुलीच्या जन्मदाखल्यासाठी पालकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव अमळनेर येथे समोर आले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका एका चिमुकलीसह तिच्या पालकांना बसत असून, दहा महिन्यांहून अधिक काळ उलटूनही जन्मदाखला मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पालकांच्या मुलीचा जन्म १६ सप्टेंबर २०२४ रोजी अमळनेर येथील सुखांजनी हॉस्पिटल येथे झाला. हॉस्पिटलकडून जन्मनोंद उशिराने अमळनेर नगर परिषदेकडे पाठविण्यात आली. त्यानंतर पालकांनी नगर परिषदेकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे वेळेत सादर केली. मात्र, काही दिवसांनी संबंधित कार्यालयाकडून कागदपत्रे हरवल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अनेकदा पाठपुरावा करूनही आजपर्यंत जन्मदाखला देण्यात आलेला नाही, असा पालकांचा आरोप आहे.
जन्मदाखला हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळेतील प्रवेश, शासकीय योजना, आधार कार्ड, पासपोर्ट तसेच भविष्यातील अनेक कायदेशीर प्रक्रियांसाठी तो आवश्यक असतो. मात्र, एका प्रशासकीय दुर्लक्षामुळे चिमुकलीच्या हक्काचा दस्तऐवजच रखडल्याने पालकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे त्यांच्याच जन्मदाखल्यासाठी पालकांना महिनोनमहिने हेलपाटे मारावे लागणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित मुलीचा जन्मदाखला तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे :

१६ सप्टेंबर २०२४ रोजी मुलीचा जन्म

नगर परिषदेत कागदपत्रे हरवल्याचा पालकांचा आरोप

दहा महिन्यांहून अधिक काळ जन्मदाखला रखडला

शाळा प्रवेश व शासकीय योजनांमध्ये अडचणी

चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *