इंदिरा गांधी विद्यालयाची गौरवशाली झेप; प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी, अनिल पाटील उपमुख्याध्यापक तर भारती पाटील पर्यवेक्षीका
1 min read

इंदिरा गांधी विद्यालयाची गौरवशाली झेप; प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी, अनिल पाटील उपमुख्याध्यापक तर भारती पाटील पर्यवेक्षीका

Loading

इंदिरा गांधी विद्यालयाची गौरवशाली झेप; प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी, अनिल पाटील उपमुख्याध्यापक तर भारती पाटील पर्यवेक्षीका

धरणगाव प्रतिनिधी
इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण संख्यात्मक व गुणात्मक प्रगतीची दखल घेत सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी मिळाली आहे. या पदावर ज्येष्ठ व अनुभवी शिक्षक अनिल पाटील यांची उपमुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भारती पाटील यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, बोर्ड परीक्षांतील उल्लेखनीय निकाल, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान, सामाजिक व विविध सहशालेय उपक्रमांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थीसंख्येतही मोठी वाढ झाली असून शासनाच्या निकषांनुसार विद्यालयाला प्रथमच उपमुख्याध्यापक पद मंजूर झाले आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उपमुख्याध्यापकपदी नियुक्त झालेले अनिल पाटील यांनी अनेक वर्षे अध्यापनासोबत शालेय प्रशासन, शिस्त, विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा विद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याला निश्चितच नवा वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तर भारती पाटील यांनीही विद्यार्थीकेंद्री अध्यापन, गुणवत्तावाढ, शैक्षणिक नियोजन आणि शालेय उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावली आहे. पर्यवेक्षिका म्हणून त्यांच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक कामकाज अधिक परिणामकारक व गुणवत्तापूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नियुक्तीबद्दल संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील आणि सचिव सी. के. पाटील,संचालक अनुराग वाजपेयी यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी विद्यालयाची वाढती शैक्षणिक प्रतिष्ठा, उत्कृष्ट निकाल आणि विद्यार्थीहितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही संस्था शिक्षण क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, प्रा. व्ही. जी. पाटील प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक बळवंत पाटील, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनिल पाटील आणि भारती पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची ही यशस्वी वाटचाल आणि नव्या पदांना मिळालेली मान्यता ही केवळ संस्थेचा सन्मान नसून धरणगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *