स्वामिनी प्रकल्पांतर्गत ३० महिलांनी पूर्ण केले अँडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण , आधार बहुउद्देशीय संस्थेचा १६ दिवसीय उपक्रम यशस्वी; प्रमाणपत्र वितरणाने प्रशिक्षणाची सांगता, स्वयंरोजगारासाठी महिलांना नवे कौशल्य
![]()
स्वामिनी प्रकल्पांतर्गत ३० महिलांनी पूर्ण केले अँडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण
आधार बहुउद्देशीय संस्थेचा १६ दिवसीय उपक्रम यशस्वी; प्रमाणपत्र वितरणाने प्रशिक्षणाची सांगता, स्वयंरोजगारासाठी महिलांना नवे कौशल्य
अमळनेर प्रतिनिधी : आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोळा दिवसीय ऍडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. महिलांना ब्लाऊज, ड्रेस आदी वस्त्रांवर आकर्षक आरी वर्कची कला आत्मसात करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षणामध्ये एकूण ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान महिलांना बेसिकपासून ॲडव्हान्स स्तरापर्यंत विविध प्रकारचे आरी वर्क, आधुनिक डिझाइन्स आणि व्यावसायिक पद्धतीने काम करण्याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात सहभागी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मा.जयश्री अनिल पाटील , कांचन शहा , आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील तसेच कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. भारती पाटील यांनी महिलांनी कौशल्याच्या बळावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन उद्योजकतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. जयश्री अनिल पाटील यांनी अशा प्रशिक्षणांमुळे महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असून महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
प्रशिक्षिका नयना राजपूत यांनी सहभागी महिलांना बेसिक ते अॅडव्हान्स आरी वर्कचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद यांनी महिलांनी तयार केलेल्या आरी वर्क नमुन्यांची पाहणी करून त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मुरलीधर बिरारी, समन्वयक उर्जिता शिसोदे तसेच संस्थेचे कार्यकर्ते भावेश मराठे यांनी विशेष सहकार्य केले.

