उत्स्फूर्त सहभागाने रंगली मराठा समाज महिला मंडळाची वक्तृत्व स्पर्धा , अचानक दिलेल्या विषयांवर महिलांनी दाखविले प्रभावी वक्तृत्व; गुणवंत व हौशी महिलांना मिळाले प्रेरणेचे विचारपीठ
![]()
उत्स्फूर्त सहभागाने रंगली मराठा समाज महिला मंडळाची वक्तृत्व स्पर्धा
अचानक दिलेल्या विषयांवर महिलांनी दाखविले प्रभावी वक्तृत्व; गुणवंत व हौशी महिलांना मिळाले प्रेरणेचे विचारपीठ
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत, हौशी व होतकरू महिलांच्या सुप्त वक्तृत्व गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि सामाजिक विषयांवर प्रभावीपणे आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या अचानक दिलेल्या विषयांवरील वक्तृत्व स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर उत्कृष्ट मांडणी करत आपल्या वक्तृत्व कौशल्याची छाप पाडली. स्पर्धेमुळे महिलांना स्वतःच्या विचारांना अभिव्यक्त करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळाले असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
स्पर्धेतील निकालात जयश्री पवार यांनी प्रथम क्रमांक, सीमा पाटील यांनी द्वितीय क्रमांक तर स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रेखा मराठे आणि अपेक्षा पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत आशा पाटील, पूजा पाटील, श्वेता पाटील, शोभा पाटील, रजुताई सूर्यवंशी, मंगलाबाई पाटील, प्रतिभा शिसोदे, मनीषा पाटील, उर्मिला पाटील, प्रियदर्शनी भोसले, माधुरी पाटील आणि योगिता सूर्यवंशी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री पाटील होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुलोचना वाघ यांनी केले. सौ. गायत्री भदाणे व सौ. स्वप्ना पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
स्पर्धेचे परीक्षण सौ. भारती (आक्का) पाटील आणि सौ. भारती पाटील यांनी निष्पक्षपणे केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या मंगला पाटील, सुनीता पाटील, लीना पाटील, पद्मजा पाटील, माधुरी पाटील, मनीषा पाटील, प्रभावती पाटील, राजश्री पाटील, कृपाली पाटील आणि नलिनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थितांनी स्पर्धकांच्या प्रभावी वक्तृत्वाला उत्स्फूर्त दाद देत भविष्यातही अशा बौद्धिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



