पंढरीची वारी, मानवतेची शाळा”  “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया…”
1 min read

पंढरीची वारी, मानवतेची शाळा” “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया…”

Loading

पंढरीची वारी, मानवतेची शाळा”

“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
कर कटावरी ठेवोनिया…”

ही अभंगाची ओळ मी अनेकदा ऐकली होती; पण यंदा ती प्रत्यक्ष जगण्याचा योग आला. पुणे ते सोलापूर हद्द ओलांडून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीत आर.एस.पी. रस्ता वाहतूक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्य करण्याची संधी लाभली. ठाणे जिल्हा शिक्षण कार्यालयाच्या आदेशानुसार उल्लास नवभारत साक्षरता अभियान, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या साक्षरता वारी आणि वाहतूक सुरक्षा अभियानात सहभागी होताना मी केवळ कर्तव्य बजावत नव्हतो, तर माणुसकीच्या महासागरात स्नान करत होतो.

वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही; ती श्रद्धा, समता, सेवा आणि प्रेम यांचा अखंड उत्सव आहे. हजारो-लाखो वारकरी दिवसागणिक हजारो पावले चालत होते. मुंग्यांच्या रांगेसारखी शिस्त, एकमेकांची काळजी आणि विठ्ठल भेटीची आस त्यांच्या प्रत्येक पावलातून जाणवत होती. प्रत्येक चेहऱ्यावर थकवा होता, पण त्यापेक्षा कितीतरी अधिक तेज होते—विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती.

“ज्ञानोबा माऊली तुकाराम,
विठ्ठल नामी सुखाचा धाम.”

वारीत मला सर्वांत जास्त भावले ते अन्नदानाचे अद्भुत दर्शन. विश्रांतीच्या ठिकाणी वारकरी स्वतःच्या हाताने बनवलेली बाजरीची भाकरी, बेसन, ठेचा, मसालेदार रस्सा, डाळ-भात, छोले, मसालेभात, उपवासाची खिचडी, साबुदाणा वडे असे असंख्य पदार्थ प्रेमाने वाढत होते. त्या अन्नात केवळ चव नव्हती, तर मायेचा स्पर्श होता. इतके स्वादिष्ट भोजन अनेक नामांकित हॉटेलांनाही जमणार नाही, अशी अनुभूती आली.

अनेक दानशूर व्यक्ती बिस्किटे, पाणी, उसाचा रस, पोहे, फळे आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप करत होत्या. काही कुटुंबे आपल्या आर्थिक क्षमतेनुसार अन्नदान करत होती. लाखो वारकरी चालत असूनही कोणीही उपाशी राहू नये, याची व्यवस्था जणू स्वतः विठ्ठलच विविध रूपांत उभा राहून करत होता.

या संपूर्ण सोहळ्यात पोलीस प्रशासन आणि वाहतूक व्यवस्थापन करणारे अधिकारी अत्यंत संयमाने, शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत होते. एवढ्या प्रचंड जनसमुदायाचे व्यवस्थापन किती कठीण असते, याची मला जवळून जाणीव झाली. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर तणाव नव्हता; सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठाच होती.

वारीत मला सर्वांत मोठा धडा मिळाला तो समतेचा. प्रत्येक जण एकमेकांना “माऊली” म्हणून संबोधत होता. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही; कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. लहानांनी मोठ्यांच्या पाया पडणे, मोठ्यांनी प्रेमाने आशीर्वाद देणे, गळाभेट घेणे, एकमेकांची विचारपूस करणे—हे दृश्य पाहताना मन अक्षरशः भरून आले.

जणू प्रत्येकाच्या रूपात विठ्ठलच उभा होता. कुणाच्या चेहऱ्यावर राग नव्हता, अहंकार नव्हता, मत्सर नव्हता. होती ती फक्त भक्ती, प्रेम आणि माणुसकी.

“विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता,
माणुसकीचा झाला मेळा.”

वारीने मला शिकवले की देव फक्त मंदिरात नसतो; तो प्रत्येक सेवाभावी हातात, प्रत्येक प्रेमळ नजरेत आणि प्रत्येक मदतीच्या कृतीत असतो. आपण प्रत्येक माणसात देव पाहायला शिकलो, तर जात, धर्म, पंथ, भाषा आणि मतभेद यांच्या भिंती आपोआप कोसळतील.

शाळेत आपण रोज म्हणतो—”भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.” पंढरपूर वारीत या प्रार्थनेचा खरा अर्थ मला अनुभवायला मिळाला. जर वारीतील प्रेम, समता, सेवा आणि बंधुभाव आपण दैनंदिन जीवनात जपला, तर “सुजलाम् सुफलाम्” भारताचे स्वप्न निश्चितच साकार होईल.

पंढरपूरची वारी माझ्यासाठी केवळ धार्मिक यात्रा नव्हती; ती जीवन समृद्ध करणारी, माणुसकी शिकवणारी आणि भारताच्या संस्कृतीचे खरे दर्शन घडवणारी एक जिवंत विद्यापीठ होती.

– यश महाजन
आर.एस.पी. रस्ता वाहतूक सुरक्षा अधिकारी
कला शिक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *