एसटी महामंडळाच्या अन्यायकारक बस भाडेवाढीविरोधात अमळनेर काँग्रेसचे तीव्र आंदोलन , आगार व्यवस्थापकांना निवेदन; स्वच्छता अधिभार व वाढीव भाडे तातडीने रद्द करण्याची मागणी, बसस्थानकात घोषणाबाजी करून प्रवाशांची जनजागृती
1 min read

एसटी महामंडळाच्या अन्यायकारक बस भाडेवाढीविरोधात अमळनेर काँग्रेसचे तीव्र आंदोलन , आगार व्यवस्थापकांना निवेदन; स्वच्छता अधिभार व वाढीव भाडे तातडीने रद्द करण्याची मागणी, बसस्थानकात घोषणाबाजी करून प्रवाशांची जनजागृती

Loading

एसटी महामंडळाच्या अन्यायकारक बस भाडेवाढीविरोधात अमळनेर काँग्रेसचे तीव्र आंदोलन

आगार व्यवस्थापकांना निवेदन; स्वच्छता अधिभार व वाढीव भाडे तातडीने रद्द करण्याची मागणी, बसस्थानकात घोषणाबाजी करून प्रवाशांची जनजागृती

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्या सव्वा वर्षात टप्प्याटप्प्याने केलेल्या बस भाडेवाढीविरोधात अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने सोमवारी (दि. १३ जुलै २०२६) आक्रमक भूमिका घेतली. अमळनेर आगार व्यवस्थापक श्री. चौधरी यांना सविस्तर निवेदन देत अन्यायकारक भाडेवाढ व दोन रुपयांचा स्वच्छता अधिभार तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बसस्थानक परिसरात घोषणाबाजी करून प्रवाशांमध्ये जनजागृतीही करण्यात आली.

तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी यांनी उपस्थित कार्यकर्ते व प्रवाशांना निवेदनाचा आशय समजावून सांगताना सांगितले की, राज्य परिवहन महामंडळाने अल्पावधीतच २५ टक्क्यांहून अधिक भाडेवाढ करून सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भार टाकला आहे. डिझेलचे वाढते दर, इतर खर्च किंवा विविध कारणांचा आधार घेत वारंवार भाडेवाढ केली जात आहे. मात्र, त्यामागील आर्थिक गणित आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचा विचार केला जात नाही.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २४ जानेवारी २०२५ रोजी १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीसाठी तात्पुरती १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी संपूनही ती कमी करण्यात आलेली नाही. उलट त्यातच प्रति प्रवासी दोन रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारण्याचा नवा निर्णय घेतल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
काँग्रेसच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दहा किलोमीटरचा प्रवास असो किंवा शंभर किलोमीटरचा, प्रत्येक प्रवाशाकडून समान दोन रुपये अधिभार आकारला जात आहे. विशेष म्हणजे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोफत प्रवासाची सुविधा दिली असली, तरी त्यांनाही हा स्वच्छता अधिभार भरावा लागत आहे, ही बाब अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले.
यावेळी महामंडळाला तेल कंपन्यांकडून प्रति लिटर ५ रुपये १३ पैशांची सवलत मिळत असतानाही त्याचा लाभ प्रवाशांना दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच दिवाळी, अक्षय तृतीया, उन्हाळी सुट्टी यांसारख्या गर्दीच्या काळात कोणतेही ठोस कारण नसताना अतिरिक्त भाडेवाढ करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

महामंडळाच्या तोट्याबाबतही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तोट्याची खरी कारणे शोधून अनावश्यक खर्चाला आळा घालणे, बेहिशेबी सवलतींचा फेरविचार करणे, आर्थिक व्यवस्थापन सुधारणे याऐवजी केवळ प्रवाशांवर भाडेवाढीचा बोजा टाकला जात असल्याची टीका करण्यात आली. अशा धोरणामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीला चालना मिळण्याची शक्यता असून, राज्य परिवहन महामंडळाच्या दीर्घकालीन हितालाही त्याचा फटका बसू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले.
अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने अन्यायकारक बस भाडेवाढ आणि दोन रुपयांचा स्वच्छता अधिभार तात्काळ रद्द करावा, अन्यथा प्रवाशांच्या हितासाठी तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, जिल्हा सरचिटणीस मनोज पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, तालुका राष्ट्रसेवा दल अध्यक्ष बन्सीलाल भागवत, तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, काशिनाथ वना पाटील, दिलीप साहेबराव पाटील, पी. वाय. पाटील, माजी शहराध्यक्ष लोटन अण्णा चौधरी, तालुका सरचिटणीस सुधाकर भैसे, तालुका उपाध्यक्ष कन्हैयालाल कापडे, ॲड. रज्जाक शेख, मगन वामन पाटील, पार्थराज पवार, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू भाट, सईद तेली, शालिग्राम पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *