सेवेच्या संस्कारांचा अनोखा आदर्श!, अमळनेरच्या बिऱ्हाडे दांपत्याने पारोळ्यातील ‘परिश्रम’ मतिमंद निवासी शाळेत साजरा केला लेकीचा दुसरा वाढदिवस; विशेष मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ व किराणा मदतीचा हात
![]()
सेवेच्या संस्कारांचा अनोखा आदर्श!
अमळनेरच्या बिऱ्हाडे दांपत्याने पारोळ्यातील ‘परिश्रम’ मतिमंद निवासी शाळेत साजरा केला लेकीचा दुसरा वाढदिवस; विशेष मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ व किराणा मदतीचा हात
भपकेबाज वाढदिवसांना दिला माणुसकीचा पर्याय; विशेष मुलांसोबत आनंद वाटत समाजापुढे ठेवला प्रेरणादायी आदर्श
पारोळा प्रतिनिधी :
आजच्या काळात वाढदिवस म्हणजे लाखोंचा खर्च, भव्य सजावट आणि दिखाऊपणाचे प्रदर्शन अशीच सर्वसाधारण धारणा निर्माण झाली आहे. मात्र, अमळनेर येथील सेवाभावी श्री. हरीओम चिंधु बिऱ्हाडे (MSCB) व सौ. जयश्री हरीओम बिऱ्हाडे या दांपत्याने आपल्या कन्या चि.कु. मनस्वी हिचा दुसरा वाढदिवस अत्यंत वेगळ्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करून माणुसकीचे सुंदर उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी पारोळा येथील ‘परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा’ येथे विशेष मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी वाढदिवसाचा आनंद केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता, विशेष मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा संकल्प बिऱ्हाडे दांपत्याने प्रत्यक्ष कृतीतून साकारला.
ही निवासी शाळा ‘चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे’ संस्थेद्वारे संचलित असून, येथे शिक्षण घेणाऱ्या विशेष मुलांसाठी बिऱ्हाडे परिवाराने खाऊ, शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप केले. याशिवाय निवासी विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याकरिता एक ग्रॅम सोन्याची वस्तू (डाग) संस्थेकडे मदत म्हणून सुपूर्द करण्यात आली. या मदतीतून मुलांच्या गरजेनुसार किराणा साहित्य खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांनी बिऱ्हाडे परिवाराच्या सेवाभावी वृत्तीचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “बिऱ्हाडे परिवार हा अत्यंत कष्टाळू, सेवाभावी आणि मनाने श्रीमंत आहे. यापूर्वीही त्यांनी निवासी मुलांच्या भोजनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, प्रत्येकाने अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपावी.”
मान्यवरांच्या उपस्थितीत झाला सत्कार
या प्रसंगी श्री. प्रविण दगडू पवार, बोहरा इंग्लिश मीडियम स्कूल (पारोळा) चे श्री. नागराज माळी सर, बिऱ्हाडे परिवाराचे मित्रपरिवार तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या वतीने बिऱ्हाडे परिवाराचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या संवेदनशील सामाजिक कार्याबद्दल उपस्थितांनी मनापासून गौरवोद्गार काढले.
विशेष मुलांकडून मनस्वीला ‘हिरव्या भविष्याची’ भेट
कार्यक्रमातील सर्वात भावनिक आणि संस्मरणीय क्षण म्हणजे निवासी शाळेतील विशेष मुलांनी चि.कु. मनस्वी हिला वाढदिवसानिमित्त वृक्षाचे रोप भेट दिले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही भेट स्वीकारताना उपस्थितांचे डोळेही पाणावले. या रोपाच्या माध्यमातून मनस्वीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवस हा केवळ उत्सव नसून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यमही ठरू शकतो, हा संदेश बिऱ्हाडे दांपत्याने आपल्या कृतीतून दिला असून, त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

