अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी ‘दीड कोटींची’ आनंदवार्ता; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला हिरवा कंदील! , शासनाची प्रशासकीय मान्यता; बाजार समितीत मुक्काम, विश्रांतीसह नाममात्र ५ रुपयांत भोजनाची सुविधा, हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
![]()
अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी ‘दीड कोटींची’ आनंदवार्ता; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला हिरवा कंदील!
शासनाची प्रशासकीय मान्यता; बाजार समितीत मुक्काम, विश्रांतीसह नाममात्र ५ रुपयांत भोजनाची सुविधा, हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकरी भवनाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही किंवा विद्यमान इमारती जीर्ण अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्याची योजना शासनाने राबविली आहे. या योजनेअंतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार या प्रकल्पासाठी रु. ७५.१८ लाख (५० टक्के) शासन अनुदान दोन समान टप्प्यांत वितरित करण्यात येणार आहे. उर्वरित निधी बाजार समितीने स्वतःच्या स्वनिधीतून अथवा कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. तसेच निविदा प्रक्रियेनंतर मंजूर होणारी रक्कम प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्यास, त्याच मंजूर निविदा रकमेच्या ५० टक्के इतकेच शासन अनुदान देण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
शेतकरी भवनाच्या बांधकामापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता (स्थापत्य) यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतरच विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. तसेच बाजार समितीच्या सचिवांनी बांधकामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे सादर करावा, असेही शासनाने निर्देशित केले आहे.
प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून एका वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण करण्याचे बंधन बाजार समितीवर घालण्यात आले आहे. याशिवाय शेतकरी भवनाचा दैनंदिन खर्च, देखभाल-दुरुस्ती, वीज, पाणी, मनुष्यबळ तसेच इतर सर्व खर्च संबंधित बाजार समितीलाच करावा लागणार असून त्यासाठी शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवना सोबत शेतकऱ्यांना नाममात्र पाच रुपयात जेवणाची सोय देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मोजक्याच बाजार समित्यांना सदरचे शेतकरी भवन मंजूर झाले असून त्यात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला पणन मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या विशेष सहकाऱ्याने हा लाभ मिळाला आहे. तर खा.स्मिताताई वाघ यांचेसह आ.अनिलदादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी सदर भवन अमळनेर बाजार समितीत निर्माण होणार आहे.यासाठी सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील व संचालक मंडळातर्फे बाजार समितीला मिळालेल्या या शेतकरी भवनासाठी शासनाचे आभार मानण्यात आले आहे.
प्रतिक्रिया….
सदरच्या शेतकरी भवना साठी ३ वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान आहे.या नवीन दीड कोटीच्या शेतकरी भवनामुळे बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या गोर गरीब कष्टकरी,सामान्य शेतकरी पुरुष, महिलांना मुक्काम, विश्रांतीची सोय तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन व्यवस्था असणार असून त्यात ४० रु शासन अनुदान,५ रु,बाजार समितीचे प्रतिव्यक्ती खर्च असेल तर सदरचे भोजन हे शेतकऱ्याला केवळ नाममात्र ५ रुपयात मिळेल.त्यामुळे अमळनेरसह परिसरातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार असून सोबत हमाल मापाडी साठीही यात एक भवन असेल.कष्टकरी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान आहे.पणन मंत्री ना.जयकुमारजी रावल ,खा.स्मिताताई वाघ, तालुक्याचे कार्यकुशल आ.अनिलदादा पाटील यांचे मोलाची मदत व
सहकार्य लाभले.
अशोक आधार पाटील,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर

