शिक्षकांची भूमिका आईसारखी असावी’ , राष्ट्रभक्ती, मानवता आणि एकात्मतेची मूल्ये विद्यार्थ्यांत रुजविण्याचे प्रा. वा. ना. आंधळे यांचे आवाहन
1 min read

शिक्षकांची भूमिका आईसारखी असावी’ , राष्ट्रभक्ती, मानवता आणि एकात्मतेची मूल्ये विद्यार्थ्यांत रुजविण्याचे प्रा. वा. ना. आंधळे यांचे आवाहन

Loading

‘शिक्षकांची भूमिका आईसारखी असावी’

राष्ट्रभक्ती, मानवता आणि एकात्मतेची मूल्ये विद्यार्थ्यांत रुजविण्याचे प्रा. वा. ना. आंधळे यांचे आवाहन

धरणगांव प्रतिनिधी
“शिक्षक हा देशाच्या सद्यस्थितीतील मोठा आधार असून राष्ट्रभक्ती, समाजप्रेम, मानवता, सहिष्णुता, सकारात्मकता आणि एकात्मता या मूल्यांची रुजवात शिक्षकच करू शकतो. त्यामुळे शिक्षकाची भूमिका ही आईच्या भूमिकेसारखी असणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी केले. आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा, पिंप्री येथे आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

प्रा. आंधळे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक व पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मोबाईलचा अतिरिक्त वापर विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अध्ययन हेच विद्यार्थ्यांचे प्रमुख उद्दिष्ट असावे आणि यशप्राप्तीचे ध्येय समोर ठेवून त्यांनी सक्षम राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे. यावेळी त्यांनी संस्थेचे व शिक्षकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले.
आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा, पिंप्री येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. वा. ना. आंधळे होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची गावातून भव्य रॅली काढण्यात आली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत, समूहगीत गायन, देशभक्तीपर गीतांवरील नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले मानवी मनोरे विशेष आकर्षण ठरले.
यावेळी माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. तसेच आंतरशालेय स्पर्धा, गणित जत्रा आणि रांगोळी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रा. वा. ना. आंधळे यांचा विशेष साहित्यिक गौरव

प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितासंग्रहावर मराठवाडा विद्यापीठातील श्री. ज्ञानसागर संतोष सूर्यवंशी यांनी पीएच.डी. संशोधन केले आहे. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा. आत्माराम चिमकर यांनीही त्यांच्या साहित्यावर पीएच.डी. संशोधन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाचा गौरव म्हणून वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रा. वा. ना. आंधळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो मधुकर रामजी चौधरी, उपाध्यक्ष श्री. प्रमोद चौधरी, सचिव श्री. विनोद चौधरी, श्री. डी. एन. पाटील सर, डॉ. पिंगळे सर, श्री. विजय पाटील, भोदचे सरपंच श्री. संदीप पाटील, सौ. वैशाली चौधरी मॅडम (मुख्याध्यापिका, आदर्श प्राथमिक शाळा), श्री. संदीप सपकाळे (मुख्याध्यापक, आदर्श माध्यमिक शाळा) तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालकवर्ग व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. एस. पाटील यांनी मानले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रेरणादायी अध्यक्षीय मनोगत यामुळे आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा, पिंप्री येथील स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *