अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या हक्कांसाठी निर्णायक लढ्याची दिशा ठरली, ग्रॅच्युइटी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व दरमहा पेन्शनच्या मागण्यांवर तालुकास्तरीय सभेत सविस्तर चर्चा
![]()
अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या हक्कांसाठी निर्णायक लढ्याची दिशा ठरली
ग्रॅच्युइटी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व दरमहा पेन्शनच्या मागण्यांवर तालुकास्तरीय सभेत सविस्तर चर्चा
चाळीसगाव प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण सभा शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव येथे रामकृष्ण बी. पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करून आगामी काळातील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅच्युइटी मिळण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी, तसेच अंगणवाडी सेविका-मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासाठी करावयाच्या न्यायालयीन लढ्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यासोबतच सेविका-मदतनीसांना दरमहा पेन्शन लागू करावी, तसेच प्रोत्साहनपर रक्कम कामावर आधारित न देता ती दरमहा निश्चित मानधनाच्या स्वरूपात लागू करावी, या महत्त्वपूर्ण मागण्यांवरही उपस्थितांनी आपली मते मांडली.
देशव्यापी व राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविणार
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आगामी काळात होणाऱ्या देशव्यापी व राज्यव्यापी आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. हक्क व न्यायाच्या मागण्यांसाठी संघटितपणे लढा उभारण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांची काही व्यक्ती संघटनेच्या नावाखाली दिशाभूल करून त्यांचे नुकसान करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे रामकृष्ण बी. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणीही थारा देऊ नये आणि आपल्या हक्कांच्या प्रश्नांवर योग्य माहितीच्या आधारे एकजुटीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सभेला चाळीसगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाल्याने बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
बैठक यशस्वी करण्यासाठी सुनंदा नेरकर, रेखा गवारे, रंजना मोरे, भारती पाटील, शारदा पाटील, सरला देशमुख, यमुना जाधव, योगिनी नाईक, सुनीता पाटील, मंगला हडपे, संगीता पाटील आदींनी विशेष प्रयत्न केले.
प्रमुख मागण्या


ग्रॅच्युइटीचा लाभ • शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा • दरमहा पेन्शन • मानधनाची नियमितता • प्रोत्साहनपर रकमेऐवजी दरमहा मानधन • प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी व देशव्यापी आंदोलन

