खवशीच्या कार्तिकची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी
![]()
खवशीच्या कार्तिकची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी
अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार)
तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात २० वा गुणवत्ता क्रमांक; जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांचे यश, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळाले यशाचे फळ
खवशी, ता. अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील खवशी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कार्तिक राकेश मराठे याने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्ह्यात २० वा गुणवत्ता क्रमांक (मेरिट) पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे खवशी गावासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खवशी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एकूण ११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी कार्तिक राकेश मराठे, गायत्री रविंद्र पाटील, सुप्रिया हरिप्रसाद कापडे आणि लावण्या दिनेश कापडे हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे कार्तिकने तालुक्यात प्रथम येत जिल्ह्यात २० वा गुणवत्ता क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे.
कार्तिक हा खवशी येथील प्रगतशील शेतकरी राकेश मनोहर मराठे व जयश्री राकेश मराठे यांचा सुपुत्र असून त्याच्या या यशामुळे कुटुंबासह गावकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. नियमित अभ्यास, जिद्द, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर त्याने हे यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे वर्गशिक्षक अरुण पवार सर आणि पूनम पवार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांची सातत्याने तयारी करून घेत आत्मविश्वास वाढविल्याने विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
कार्तिकसह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन समिती आणि परिसरातील नागरिकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

