साने गुरुजी विद्यालयात गुरुवंदना; बासरीच्या स्वरांनी रंगला गुरु-शिष्य परंपरेचा अविस्मरणीय सोहळा , खान्देश सुपुत्र बासरी साधक योगेश पाटील यांच्या शिष्य परिवाराकडून भावपूर्ण गुरुवंदना; देश-विदेशातील शिष्यांचा सहभाग
1 min read

साने गुरुजी विद्यालयात गुरुवंदना; बासरीच्या स्वरांनी रंगला गुरु-शिष्य परंपरेचा अविस्मरणीय सोहळा , खान्देश सुपुत्र बासरी साधक योगेश पाटील यांच्या शिष्य परिवाराकडून भावपूर्ण गुरुवंदना; देश-विदेशातील शिष्यांचा सहभाग

Loading

साने गुरुजी विद्यालयात गुरुवंदना; बासरीच्या स्वरांनी रंगला गुरु-शिष्य परंपरेचा अविस्मरणीय सोहळा

खान्देश सुपुत्र बासरी साधक योगेश पाटील यांच्या शिष्य परिवाराकडून भावपूर्ण गुरुवंदना; देश-विदेशातील शिष्यांचा सहभाग

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी खान्देशचे सुपुत्र, बासरी साधक व प्रसारक योगेश पाटील (एरंडोल) यांच्या गुरुवंदनेचा अत्यंत भावस्पर्शी आणि संगीतमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात खान्देशासह महाराष्ट्रातील विविध शहरांमधून तसेच अमेरिकेतून आलेल्या शिष्यांनी बासरी वादनाच्या माध्यमातून आपल्या गुरूंना अनोखी गुरुदक्षिणा अर्पण केली.

योगेश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून बासरी या भारतीय शास्त्रीय वाद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. खान्देशातील ग्रामीण भागापासून महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत तसेच देशाच्या अनेक भागांत प्रत्यक्ष जाऊन ते बासरी वादनाचे प्रशिक्षण देत आहेत. ‘संगीत शिका, संगीताचा आनंद घ्या आणि जीवन अधिक आनंदी करा’ हा संदेश ते आपल्या कार्यातून देत आहेत.

पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया तसेच पं. विवेक सोनार यांच्या परंपरेतील बासरी शिक्षण व प्रशिक्षणाची परंपरा पुढे नेत योगेश पाटील यांनी आजवर असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. जळगाव, नंदुरबार, धुळे, पुणे, बुलढाणा, मुंबई, अकोला यांसह भोपाळ, सुरत, जयपूर, इंदूर आदी शहरांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना बासरीचे प्रशिक्षण दिले आहे. बासरी हे वाद्य घराघरात पोहोचावे, ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येकाला संगीताची गोडी लागावी, यासाठी त्यांचा अविरत प्रयत्न सुरू आहे. “माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बासरीचा प्रचार-प्रसार आणि विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत राहीन,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मंत्रपुष्पांजलीने गुरुपूजन; शिष्यांच्या सुरांनी सजली गुरुवंदना

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशांत कुलकर्णी (नेपानगर) यांनी मंत्रपुष्पांजली सादर करून विधिवत गुरुपूजन केले. त्यानंतर विविध ठिकाणांहून आलेल्या शिष्यांनी बासरी वादनातून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

संदिप घोरपडे (अमळनेर) यांनी ‘अच्युतम केशवम’ हे भक्तिगीत सादर केले. गोपाल बडगुजर (मुकटी) यांनी राग भूपाली, डॉ. दिव्यल चौधरी (नाशिक) यांनी राग यमन, तर परमानंद दिदी (जळगाव) यांनी ‘हे राम’ भजन सादर केले.
विलेश राजपूत (बेटावद) यांनी ‘देखा एक ख्वाब’, निलेश सोनवणे (फेकरी) यांनी ‘बडा दुःख दिया’, प्रशांत कुलकर्णी (नेपानगर) यांनी राग वृंदावनी सारंग, तर तुषार पुराणिक (भुसावळ) यांनी राग दुर्गा सादर करून रसिकांची दाद मिळवली.

सौ. संगीता नेवे (भुसावळ) यांनी ‘पल पल दिल के पास’, निशांत परदेशी (फैजपूर) यांनी ‘जब दीप जले’, अर्णव पाटील (अमळनेर) यांनी ‘महाभारत’ची ट्युन, हरिश पाटील (शिरपूर) यांनी राग बिहाग आणि घनश्याम माळी (धुळे) यांनी ‘मोहे रंग दो लाल’ सादर केले.
सुनिल कासार (पुणे) यांनी माऊथ ऑर्गनवर ‘शोले’ चित्रपटाची ट्युन तसेच बासरीवर विविध गीतांचे सादरीकरण करून कार्यक्रमात वेगळा रंग भरला. विशेष म्हणजे वैदेही पुराणिक (अमेरिका) यांनी राग शिवरंजनी सादर करून गुरु-शिष्य परंपरेच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराचे दर्शन घडविले.
यानंतर सर्व शिष्यांनी एकत्रितपणे राग भूपाली सादर करून गुरुवंदना केली. या सामूहिक वादनाला धुळे येथील तबला वादक विवेक गुरव यांनी समर्थ साथ दिली.

तबल्याच्या तालानेही रंगला कार्यक्रम

कार्यक्रमात तबला वादक तुषार पुराणिक (भुसावळ) यांचे सोलो तबला वादन झाले. त्यांच्या तालबद्ध आणि दमदार सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात स्वतः गुरु बासरी साधक योगेश पाटील यांनी शास्त्रीय बासरी वादन सादर केले. त्यांनी राग पुरिया धनाश्री सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या बासरी वादनाला श्री. योगेश दादा संदाशिव यांनी तबल्याची साथ दिली. या सोलो बासरी वादनात डॉ. दिव्यल चौधरी (नाशिक) यांनी तानपुरा वादनाची साथ दिली.
गुरु म्हणून मार्गदर्शन करण्याबरोबरच योगेश पाटील यांनी या कार्यक्रमात पाहुणे कलावंत म्हणूनही आपली कला सादर केली. त्यांच्या वादनातून शास्त्रीय संगीताची सखोलता, बासरीच्या स्वरांची माधुर्यता आणि साधनेची ताकद यांचा सुंदर अनुभव उपस्थित रसिकांना मिळाला.

गुरुजींचे जीवनच बासरीमय’ – शिष्यांचे भावस्पर्शी मनोगत

कार्यक्रमाच्या प्रस्तावना व मनोगतामध्ये संदिप घोरपडे, निलेश सोनवणे आणि गोपाल बडगुजर यांनी गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
संदिप घोरपडे यांनी आपल्या मनोगतात गुरुंच्या व्यक्तिमत्त्वाचे सुंदर रूपक मांडताना सांगितले की, “गुरुजींचे जीवनच बासरीमय आकाराचे आहे. त्यांचे मनही आतून स्वच्छ आणि पोकळ आहे. असंख्य वेदनादायी छेद आपल्या देहावर सहन करून ते इतरांचे आयुष्य स्वरमय आणि सुगंधी करतात. म्हणूनच अशी देहरूपी बासरी भगवान श्रीकृष्ण आपल्या ओठांवर ठेवतात.” त्यांच्या या भावपूर्ण विवेचनाने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
संत परमानंद दिदी यांनी भागवत ग्रंथातील काही श्लोक सांगून गुरु-शिष्य नाते, साधना आणि अध्यात्म यावर मार्गदर्शन केले. निशांत परदेशी यांनी स्वरचित कविता सादर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. तर सौ. संगीता नेवे (भुसावळ) यांनी गुरुंना मुलाप्रमाणे मानून आपल्या मनातील जिव्हाळ्याच्या भावना व्यक्त केल्या.

बासरी, अध्यात्म आणि योग यांचा सुंदर संगम

कार्यक्रमाला उपस्थित म.सा.प.चे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब देशमुख (अमळनेर) यांनी बासरी वादनाचे अध्यात्म आणि योगाशी असलेले नाते अत्यंत सुंदर पद्धतीने स्पष्ट केले.

ते म्हणाले की, बासरी वादन करताना शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही घटकांमध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होते. साधना जसजशी सखोल होत जाते, तसतशी मनाची एकाग्रता वाढते आणि साधकाला एका प्रकारच्या ‘शून्य’ अवस्थेचा अनुभव येतो. ही अवस्था त्याला आत्मिक उंचीवर घेऊन जाते. त्यामुळे बासरी हे केवळ संगीताचे वाद्य नसून अध्यात्म, योग, साधना आणि अंतर्मुखतेशी जोडणारे माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिष्य परिवार वृक्ष’ ठरला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

गुरु-शिष्य परंपरेचे अनोखे प्रतीक म्हणून डॉ. दिव्यल चौधरी (नाशिक) यांनी साकारलेला ‘शिष्य परिवार वृक्ष’ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
या संकल्पनेत वृक्षाच्या मुळाशी गुरु योगेश पाटील यांचे स्थान दर्शविण्यात आले आहे. वृक्षाच्या विविध फांद्यांवर शिष्यांची नावे तसेच त्यांच्या अंगठ्यांचे ठसे घेण्यात आले. गुरुंकडून मिळालेले ज्ञान, संस्कार, संगीताची साधना आणि परंपरा ही शिष्यांच्या माध्यमातून पुढे विस्तारत राहते, या भावनेचे प्रभावी प्रतीक या परिवार वृक्षातून मांडण्यात आले.
या संकल्पनेमुळे गुरु-शिष्य नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून ते ज्ञान, संस्कार आणि परंपरेची अखंड साखळी पुढे नेणारे नाते आहे, हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला.

देश-विदेशातील शिष्यांची उपस्थिती; गुरु-शिष्य परंपरेचा गौरव

या गुरुवंदना कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे खान्देश, महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांतून शिष्य सहभागी झाले होते. अमेरिकेतून वैदेही पुराणिक यांनी सहभाग नोंदवत गुरुंच्या संगीत साधनेची व्याप्ती देशाच्या सीमाही ओलांडून गेल्याचे दाखवून दिले.
कार्यक्रमास पालक, संगीतप्रेमी, नागरिक आणि रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती. प्रत्येक सादरीकरणानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. बासरीच्या मधुर स्वरांनी, तबल्याच्या तालाने, भक्तिगीतांनी, शास्त्रीय रागांनी आणि भावपूर्ण मनोगतांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलेश राजपूत (बेटावद) आणि हरिश पाटील (शिरपूर) यांनी प्रभावीपणे केले.
एकूणच, साने गुरुजी विद्यालयातील ही गुरुवंदना केवळ संगीताचा कार्यक्रम न राहता गुरु-शिष्य परंपरेचा गौरव, भारतीय शास्त्रीय संगीताची साधना, अध्यात्माशी जोडलेली बासरी आणि ज्ञानाची पुढील पिढीकडे होणारी वाटचाल यांचा सुंदर संगम ठरली. योगेश पाटील यांच्या दीर्घ संगीतसाधनेतून घडलेला शिष्य परिवार एकत्र येत गुरूंना अर्पण केलेली ही स्वरांजली अमळनेरच्या सांस्कृतिक विश्वात निश्चितच स्मरणीय ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *