संत सखाराम महाराज पायी वारीत ५४ हजार बियाण्यांचे समर्पण – पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश  रोटरी क्लब अमळनेर व महिला हाऊसिंग ट्रस्टचा अभिनव उपक्रम
1 min read

संत सखाराम महाराज पायी वारीत ५४ हजार बियाण्यांचे समर्पण – पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश रोटरी क्लब अमळनेर व महिला हाऊसिंग ट्रस्टचा अभिनव उपक्रम

Loading

संत सखाराम महाराज पायी वारीत ५४ हजार बियाण्यांचे समर्पण – पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश

रोटरी क्लब अमळनेर व महिला हाऊसिंग ट्रस्टचा अभिनव उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
सद्गुरू संत सखाराम महाराज यांच्या पायी वारीच्या पवित्र सोहळ्यात यावर्षी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत तब्बल ५४,००० बियाण्यांच्या रोपण व सीड बॉल निर्मिती अभियानास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाद्वारे अध्यात्म आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम साधण्यात आला.
यापैकी ३६,००० बियाणे संत सखाराम महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली, तर १८,००० बियाण्यांचे वाटप अमळनेर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ५४,००० बियाण्यांचे रोपण व सीड बॉल निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
वारीचे प्रमुख हरिभक्त परायण श्री. देव महाराज गुरव यांच्याकडे या बियाण्यांचे संवर्धन व रोपण करण्याची सेवा सोपविण्यात आली. वारी मार्गावरील रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये तसेच पंढरपूरपर्यंतच्या विविध वनक्षेत्रांमध्ये ही बियाणे पेरण्यात येणार असून भविष्यात हजारो वृक्ष निर्माण करण्याचा संकल्प यामागे आहे.
या उपक्रमाची संकल्पना प्रोजेक्ट चेअरमन रो. आशिष चौधरी यांची असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी सीड बॉल अभियान राबविण्यात येते. पर्यावरण संवर्धनासाठी जनसहभाग वाढावा, विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम निर्माण व्हावे आणि भविष्यात हरित परिसर घडावा हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

रोटरी क्लब अमळनेर आणि महिला हाऊसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात महिला हाऊसिंग ट्रस्टच्या विविध विभागांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सीड बॉलचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. देवेंद्र कोठारी आणि सचिव रो. आशिष चौधरी यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. वृक्षारोपणाचे महत्त्व, वाढते तापमान, पाणीटंचाई, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्याची गरज याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास विद्यार्थिनी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान देण्याची तयारी दर्शविली.
या दोन्ही प्रकल्पांना रोटरी क्लब अमळनेरच्या नूतन कार्यकारिणीचे विशेष सहकार्य लाभले. यामध्ये नूतन अध्यक्ष रो. महेश पाटील, नूतन सचिव तथा उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, रो. चेलाराम सेनानी, डॉ. अनिल वाणी, सनी कोठारी, प्रीतपाल सिंग बग्गा, अजय रोडगे, आशिष चौधरी यांच्यासह अनेक रोटेरियन्स सहभागी झाले होते. तसेच महिला हाऊसिंग ट्रस्टच्या सर्व महिला सदस्यांनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.
पर्यावरण संरक्षणासाठी धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा प्रभावी वापर करून राबविण्यात आलेला हा अभिनव उपक्रम अमळनेर परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. “एक बीज – हजारो वृक्ष” या संकल्पनेतून भविष्यात हरित अमळनेर आणि हरित महाराष्ट्र घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
“५४ हजार बियाणे – हजारो वृक्ष – हरित भविष्य” हा संदेश देत रोटरी क्लब अमळनेर आणि महिला हाऊसिंग ट्रस्टचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *