प्रति पंढरपूर अमळनेर अग्नि ज्वालांनी धगधगले.. .!
![]()
प्रति पंढरपूर अमळनेर अग्नि ज्वालांनी धगधगले.. .!
अत्यंत दुखद घटना..!,प्रती पंढरपूर म्हटल्या जाणाऱ्या अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला अग्निज्वालांनी वेढले.
व्हिडिओ कॅमेऱ्यामुळे शॉक सर्किटचे निमित्त मात्र झाले असले तरी अत्यंत दुखद अशी ही घटना आहे.
200 वर्षाची परंपरा लाभलेले असे हे आमचे प्रति पंढरपूराचे रूप असलेले अमळनेर शहरात संत सखाराम महाराजांच्या वाढी संस्थानाला अग्नी ज्वालांनी वेढले. संत सखाराम महाराज, गादी पुरुष असलेले प.पू.प्रसाद महाराज आपल्या पायी वारीसाठी पंढरपूरला प्रस्थान केले असताना ही दुर्दैवी घटना घडली …!
महाराष्ट्रात , त्यातल्या त्यात खानदेशात जेवढ्या काही यात्रा भरतात .त्या यात्रांचा शेवट हा अंमळनेरच्या संत सखाराम महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने होतो. कारण त्यानंतर मृग नक्षत्र लागतो आणि शेतकऱ्यांचे शेतीची कामं सुरू होत असतात. निसर्गाच्या चक्रानुसार खानदेशातील यात्रा महोत्सवाचे सुद्धा एक प्रकारचे चक्र असते. यात सहभाग वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे वाले ,मौत का कुवा वाले ,खाद्यपदार्थ, मिठाई, खेळणे ,धार्मिक पुस्तके वगैरे व्यावसायिक आणि त्याच्यावर आपली उपजीविका करणारे व्यापारी बंधू आणि धार्मिकता जपणारे भाविक यांचात हा ताळमेळ असतो.
“उच्छाव” ची यात्रा म्हणून सुपरिचित हा यात्रा महोत्सव पूर्वी साधारण एक ते दीड महिन्याच्या कालावधीत असायचा.
तो काळ साधारण 1970ते 80 च्या असा होता . संसार उपयोगी वस्तूंचा बाजार येथे भरायचा .पोळपाट लाटण्या पासून ते दगडी वरवंट्यापर्यंत सर्व वस्तू येथे उपलब्ध असायच्या.
या यात्रेच्या निमित्ताने सासरी गेलेल्या माहेरवाशीनि आपल्या माहेरी मुद्दाम, संत सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी यायच्या. आणि त्याचवेळी आपल्या संसाराला लागणाऱ्या ज्या काही वस्तू(किटूक माटूक) असतील त्या येथे विकत घ्यायच्या.
साधारणपणे मृग नक्षत्र लागल्यानंतर बोरी नदीला पहिला पूर आल्यानंतर बऱ्याच वेळा ,यात्रा पाण्यात वाहून जायची .डांगर- टरबूज ची दुकाने पाण्यात वाहून जायची. पोहणाऱ्या तरुणांची डांगर टरबूज पकडण्यासाठी चंगळ व्हायची.
नदीला पूर आल्यामुळे ही यात्रा उठायची. त्यानंतर परंपरागत शेतकरी ,शेतमजूर आपल्या शेतातील मेहनतीची कामे सुरू करायचे.
यात्रेची सुरुवात रथोत्सवांने व्हायची. पाचव्या दिवशी पालखी असायची. पालखीला सुद्धा तेवढीच गर्दी असायची त्यादिवशी अमळनेर येथील जवळजवळ सर्व 34 व्यायाम शाळाचे लेझीम पथक हजार असायची. प्रताप मिल यांचेही पाण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध असायचे .
रथयात्रा ही संध्याकाळी संत सखाराम महाराजांच्या वाढीतून प्रस्थान करायची रथ, हा सराफ बाजारातून, बोरी नदीच्या फरशी पुलावरून निघून पैलाड आणि त्यानंतर कसाली मोहल्ला मार्गाने आपल्या मूळ ठिकाणी पहाटे पहाटे पोहचायचा. फरशी पुलावर आल्यानंतर रथ तेथे विश्रांती घेत असताना फटाक्यांची आताशबाजी खर तर हा या यात्रा महोत्सवातील देखणीय प्रसंग असायचा..! ही आताशबाजी साधारण रात्री साडेनऊ दहा, च्या वेळेस पाहायला मिळायची. आणि त्यासाठी हजारोच्या संख्येने भावीक, तेथे हजर राहायचे. ग्रामीण भागातून आलेल्या बैलगाड्या, पायी येणारे श्रद्धाळू तसेच वाहनांच्या मार्फत आलेले भाविक अशी ही सर्व गर्दी असायची. आताशबाजी चा शेवट जेव्हा फुलझडी ही लावली जायची आणि त्या फुलझडीच्या प्रकाशात जेव्हा फरशी पुलावर हजारोंच्या संख्येने यात्रेत सहभागी असलेले गर्दी बघून, बाहेर गावाहून आलेले भाविक आश्चर्यचकित व्हायचे..! यात्रेतील समाधी स्थळावर महाराष्ट्रातील नामवंत, संत, महात्म्यांचे कीर्तन ,प्रवचनाच्या कार्यक्रमाचा असायचा. त्यानंतर बोरी नदीच्या वाळवंटातच थकले भागलेले भावीक, यात्रेकरू तेथेच झोपायचे. कुठल्याच अंथरूण पांघरूना ची गरज नसायची. असा हा आनंद सोहळा असायचा.अति भव्य हा अंमळनेर चा यात्रा महोत्सव होत होता. आजही तो त्याच परंपरेने होत आला आहे .संत सखाराम महाराज यांच्या यात्रेचा हा दोनशे वर्षाच्या इतिहास खरंतर परंपरे च्या दिशेने होणारा असा सोहळा होता.गादी पुरुष सुद्धा ‘देव’ घराण्यातील हा परंपरेने ठरवला गेला होता.
-आणि त्याच परंपरेने आज सुद्धा त्यात भक्ती भावाने हा उत्सव साजरा होत असतो. जसं संत सखाराम महाराज अमळनेर करांचे कुलदैवत आहेत..!
काळाच्या ओघात सर्व काही बदलले. अमळनेर शहर सुद्धा बदलले. संत सखाराम महाराजांची जन्मभूमी ही श्रीमंत प्रताप शेठजी यांची उद्योग नगरी सुद्धा झाली, विप्रो कंपनीचे अजीम प्रेमजी यांनी डालडा वनस्पतीच्या रूपाने नवउद्योग सुरू केला तसेच आर के पटेल यांची पटेल दर्जा अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.
– म्हणजेच ज्यावेळेला बोरी नदीवर फरशीपूल नव्हता. त्यावेळेला बोरी नदीतून रथयात्रा निघायची. आज बोरी नदीवर दोन्ही बाजूने पूल बांधले गेले. या रथाचे वैशिष्ट्य असे होते की, काही श्रद्धाळू रथ ओढण्यासाठी पायात चप्पल घालत नसत. काही भाविक श्रद्धाळू आपल्या गावातून अनवाणि, संत सखाराम महाराजांचे समाधीचे दर्शन घेत.
रथाच्या चाकाला मोगऱ्या लावण्याचा मान भोई समाज बांधवानां होता तसेच मुस्लिम समाज बांधवांचे योगदान या रथ यात्रे साठी महत्त्वाचे ठरत असे. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी व्हायचे .असा हा रथ महोत्सव खानदेशातील प्रति पंढरपूर असलेल्या अमळनेरात साजरा होत होता .आजही होत असतो .
अशी ही एक परंपरा होती..!
पूर्वीच्या काळी आद्य परमपूज्य संत सखाराम महाराज बोरी नदीच्या काठावर झोपडी बांधून राहत आणि त्यानंतर ज्यावेळी ते पंढरपूरकडे प्रस्थान करत त्यावेळी आपण बांधलेली झोपडी ते स्वतः पेटवून देत असत.
खरंतर हे एक वैराग्याचं, साधुत्वाचे, विठ्ठला प्रति एकरूप व्हायचं प्रामाणिकपणा चे लक्षण होते..! आणि तेवढ्यात श्रद्धेने भाविक सुद्धा त्यांच्याबरोबर पायी दिंडी साठी त्यांच्यात सहभागी होत.
हे या यात्रेचे वैशिष्ट्ये होते ..!
आता सर्व बदलले. परिस्थिती बदलली,
माणसं बदलले, पैसा अडका आला, माणसातील श्रद्धा ही स्वार्थाने भारावली गेली, यात्रेचे स्वरूप बदलले. माणसातील अध्यात्मिक वृत्ती बदलली ,यात्रेला बाजारू स्वरूप आले.
आणि आता तर यात्रा जोरात भरते. भयंकर गर्दी होते.
माणूस माणसाला सापडत नाही.
परंतु अमळनेर चा संत सखाराम महाराजांचा रथ ओढायला माणसे मिळत नाही.
– त्यामुळे रथ ओढायला ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली..!
शॉक सर्किटने आगी लागतात. हे मान्य आहे. आधुनिक युगात अशा घटना, दुर्घटना होतात हेही मान्य आहे . परंतु प्रत्यक्ष संतांच्या भूमीत ,विठुरायाच्या मंदिरात, दुर्दैवाने शॉक सर्किट व्हावे.
हा सुद्धा दुर्दैवी काळाचा आघात असावा का..?
गोकुळ बागूल
21, टेलिफोन कॉलनी,
मु.पो. ता. अमळनेर
जि. जळगाव
मो.9422276140

