वाडी संस्थानला मोठी आग, आग विझवताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन… भीषण आगीत देव शाबूत राहिले, मंदिर काही दिवस राहणार बंद…
![]()
वाडी संस्थानला मोठी आग, आग विझवताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन…
भीषण आगीत देव शाबूत राहिले, मंदिर काही दिवस राहणार बंद…
प.पू. प्रसाद महाराज :
“अफवांवर विश्वास ठेवू नका; श्रींच्या कृपेने वारी
खासदार स्मिताताई वाघ :
“घटना दुर्दैवी; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना, परिस्थितीवर सातत्याने लक्ष”
आमदार अनिल पाटील :
“अतिरिक्त अग्निशामक बंब तातडीने मागविले; सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन):- संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा प्रति पंढरपूर अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थांनला शॉर्ट सर्किटने आग लागली. दरम्यान बोरी नदी काठाला रस्ते केल्याने अग्निशमन बंब पोहचू शकले. अन्यथा सराफ बाजरातील निमुळत्या रस्त्यातून अग्निशमन बंम्ब पोहचणे शक्य नव्हते.
सकाळी हभप प्रसाद महाराज अमळनेरची संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूर कडे रवाना झाले. आणि रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही यंत्रणेला शॉर्टसर्किटने वाडी संस्थानातील विठ्ठल रुख्मिनी मंदिराच्या वरच्या बाजूला प्रसाद महाराजांच्या बैठक खोलीला आग लागली. मंदिर संपूर्ण लाकडी आणि दरवर्षी ऑइल पेंट लावत असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. तातडीने अग्निशमन दल , अमळनेर, पारोळा येथील बंम्ब , खाजगी वाहने, नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
शेकडो वर्षापूर्वीचे मंदिर असून आगीत जळाले मात्र प्रसाद महाराजांची दिंडी थांबली नाही. आधी पांडुरंग महत्वाचा म्हणत महाराज माघारी फिरलेच नाहीत. स्वतःची आईचे निधन झाले होते तरी प्रसाद महाराज माघारी फिरले नव्हते. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अग्निशमन दलास घटनास्थळी पाठवले.ते स्वतःही दाखल झाले अग्निशमन शमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यास सुरवात केली.याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने आग विझविण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. आमदार अनिल पाटील यांनी चोपडा,शिरपूर,पारोळा येथील गाड्या पाठविण्याची विनंती केली.पारोळा पालिकेची गाडी तातडीने दाखल झाली. अमळनेर शहर पत्रकार संघाने सोशल मीडियावर खाजगी टँकर धारकांना आवाहन केले. आमदार अनिल पाटील यांनी आर बी कास्ट्रक्शनचे टँकर पाठविले.
पालिकेच्या वतीने नगरसेवक अनिल महाजन, पंकज चौधरी,बाळा संदनशिव, पंकज भोई,गोपी कासार,सूरज परदेशी,प्रताप साळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत,जितेंद्र ठाकुर, नितीन निळे,विजय पाटील,संजय कौतीक पाटील , महेंद्र पाटील, शोएब शेख, अरशद खान, हुजैफा पठान, इमरान पठान, नईम पठान, नसीब पठान,राजा पठान फरहान शेख, आकिब पठान, रिजवान खान यासह अनेकांनी मदतकार्य केले. इथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम स्वतः घटनास्थळी येऊन नियंत्रण करीत होते. डीवायएसपी विनायक कोते यांनी पोलीस ताफ्यासह येऊन गर्दी आटोक्यात आणली त्यामुळे अग्निशमन दलास सोईचे झाले.
सर्व काही जळाले पण देवघर शाबूत…
भीषण आगीत वाडी संस्थानात सर्व काही जळाले होते मात्र वाडी संस्थानातील देव मात्र शाबूत राहिल्याने आश्चर्य आणि आनंद व्यक्त केले जात आहे. दरम्यान मंदिराचे नुकसान झाले असल्याने स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही, तोपर्यंत काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद असेल अशी माहिती प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी चर्चेअंती दिली.
प्रतिक्रिया
“प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही बॉक्सजवळ आग लागल्याने ती वेगाने पसरली. मात्र, या घटनेमुळे वारीचा मार्ग बदलण्याचा किंवा परत फिरण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. यापूर्वी माझ्या आईचे निधन झाले तेव्हाही मी वारीतून परत फिरलो नव्हतो; त्यामुळे आता परत फिरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
सर्व वारकरी आणि भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी आणि आवश्यक ती काळजी घेऊन वारीत सहभागी व्हावे. श्रींच्या कृपेने सर्व काही सुरळीत पार पडेल.”
प. पू. प्रसाद महाराज (गादी पुरुष, संत सखाराम महाराज संस्थान, अमळनेर)
अमळनेर येथील संत श्री सखाराम महाराजवाडी संस्थेत लागलेल्या आगीबाबत खासदार स्मिताताई वाघ यांची प्रतिक्रिया
अमळनेर येथील संत श्री सखाराम महाराजवाडी संस्थेत लागलेल्या आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून, आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दल व प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. लवकरात लवकर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात यावी, हीच प्रार्थना.
— खासदार सौ. स्मिताताई वाघ
जळगाव लोकसभा
अमळनेर येथील संत श्री सखाराम महाराजवाडी संस्थेत लागलेल्या आगीच्या घटनेबाबत
आताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार अमळनेर येथील संत श्री सखाराम महाराजवाडी संस्थेमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी जवळील तालुक्यांमधून अतिरिक्त अग्निशामक दलाचे बंब मागविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून, अग्निशामक दल आणि प्रशासनाकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
संबंधित यंत्रणांच्या सतत संपर्कात असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
आमदार अनिल भाईदास पाटील अमळनेर

