सामाजिक कार्यकर्त्यांना टीमवर्क, संवाद आणि सेवाभावाचा मंत्र , सानेगुरुजी फौंडेशनच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरात सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
1 min read

सामाजिक कार्यकर्त्यांना टीमवर्क, संवाद आणि सेवाभावाचा मंत्र , सानेगुरुजी फौंडेशनच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरात सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

Loading

सामाजिक कार्यकर्त्यांना टीमवर्क, संवाद आणि सेवाभावाचा मंत्र

सानेगुरुजी फौंडेशनच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरात सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी :
सामाजिक कार्यात यशस्वी होण्यासाठी टीमवर्क, संवाद, शिस्त आणि सेवाभाव हीच खरी ताकद असल्याचा प्रेरणादायी संदेश पंचायत समिती अमळनेरचे माजी केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील यांनी दिला. सानेगुरुजी फौंडेशन, अमळनेर (जि. जळगाव) आयोजित जिल्हास्तरीय सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम शनिवारी (दि. २७ जून) संस्थेच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब नरेंद्र बाळू पाटील होते. प्रारंभी त्यांनी लिंक वर्करच्या कामकाजाचा आढावा घेत पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लिंक वर्कर्सचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक आबासाहेब गोकुळ पाटील यांनी एड्स जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्यपद्धतीवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी संस्थेच्या २५ वर्षांच्या सामाजिक प्रवासाचे कौतुक करत, “छोट्या रोपट्यापासून आज ही संस्था वटवृक्षासारखी विस्तारली असून अनेक कुटुंबांना रोजगार आणि समाजाला आधार देत आहे,” असे गौरवोद्गार काढले.

 

 

 

 

 

 

त्यांनी “Together Everyone Achieves More” या सूत्राचा उल्लेख करत, “मी नव्हे, आम्ही” ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असावी, असे सांगितले. “संवाद करा, सत्ता गाजवू नका; विश्वास कमवा. शिस्तीत प्रेम आणि प्रेमात शिस्त असावी,” असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
संघटनेच्या यशासाठी सहभागात्मक नेतृत्व, जबाबदारीचे योग्य वाटप आणि एकीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी “एका हाताची पाच बोटे एकत्र आली की वज्रमूठ तयार होते,” या उदाहरणातून टीमवर्कचे महत्त्व स्पष्ट केले. “संस्था ‘मी’ ने सुरू होते, ‘आम्ही’ ने वाढते आणि ‘आपण’ ने अमर होते,” हा विचारही त्यांनी उपस्थितांना दिला.
सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये प्रामाणिकपणा, आपुलकी, शिकण्याची वृत्ती आणि संस्थानिष्ठा हे चार गुण अत्यावश्यक असल्याचे सांगत “कर्म हीच पूजा” या विचारातून समाजसेवेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सपना लांडगे, संदीप धाकड, अमर वाणी व संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वंदना पवार यांनी केले. प्रशिक्षणामुळे उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांना नवचैतन्य, दिशा आणि समाजकार्याची नवी प्रेरणा मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *