के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘म्युझियम ऑन व्हील्स’ द्वारे इतिहासाचा जिवंत अनुभव*
![]()
*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘म्युझियम ऑन व्हील्स’ द्वारे इतिहासाचा जिवंत अनुभव*
जळगाव, दि. २७ जून : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्या ‘म्युझियम ऑन व्हील्स’ या अभिनव उपक्रमांतर्गत फिरत्या संग्रहालयाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या अनोख्या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतासह जगातील प्राचीन संस्कृतींचा अभ्यास अनुभवात्मक पद्धतीने केला.
या फिरत्या संग्रहालयामध्ये हडप्पा, इजिप्त, चीन यांसारख्या प्राचीन सभ्यतांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्राचीन वास्तुशिल्प, ऐतिहासिक वस्तू, सांस्कृतिक वारसा, पुरातत्त्वीय अवशेष, प्राचीन साहित्य आणि मानवसभ्यतेच्या उत्क्रांतीशी संबंधित विविध माहिती विद्यार्थ्यांसमोर आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली. प्रतिकृती, दृश्यात्मक सादरीकरण आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचा जिवंत अनुभव घेता आला.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आपल्या समृद्ध वारसा, संस्कृती आणि इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच भूतकाळ आणि वर्तमान यांमध्ये अनुभवाधारित संबंध प्रस्थापित करणे हा होता. ‘ऐतिहासिक संबंध : भारत आणि प्राचीन विश्व’ या विषयावर आधारित या प्रदर्शनातून भारताचे इतर प्राचीन संस्कृतींशी असलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध विद्यार्थ्यांना प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगावचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. जगन्नाथ दरंदळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व अशा उपक्रमांचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्या वतीने श्री. चिन्मय गावडे, श्रीमती श्रुती मॅडम तसेच त्यांच्या सहकारी टीमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी या फिरत्या संग्रहालयातील प्रत्येक दालन उत्सुकतेने पाहिले. इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विषयांविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. पाठ्यपुस्तकातील माहिती प्रत्यक्ष अनुभवातून समजल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. इतिहास केवळ वाचनापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून अधिक प्रभावीपणे समजून घेण्याची संधी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.


