माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” संकल्पासाठी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यापक जनजागृती ,२८ जून रोजी पल्स पोलिओ अभियान; हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रम, प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन
![]()
“माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” संकल्पासाठी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यापक जनजागृती
२८ जून रोजी पल्स पोलिओ अभियान; हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रम, प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन
मारवड | प्रतिनिधी
“माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” हा संकल्प साकार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या वतीने पल्स पोलिओ अभियान व हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानात ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ही मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी व तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
जनजागृतीचा एक भाग म्हणून सार्वजनिक भिंतींवर “लस पाजा बाळा… पोलिओ टाळा” हा संदेश लिहून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी नागरिकांना पोलिओविषयी माहिती देत, प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
यावेळी पोलिओ हा पाच वर्षांखालील मुलांमध्ये होणारा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार असून तो मज्जासंस्थेवर परिणाम करून कायमस्वरूपी अपंगत्व किंवा पक्षाघात निर्माण करू शकतो, अशी माहिती देण्यात आली. ताप, घसा दुखणे, डोकेदुखी, उलट्या, हात-पाय दुखणे, स्नायू कमकुवत होणे आणि पक्षाघात ही त्याची प्रमुख लक्षणे असल्याचेही सांगण्यात आले.
भारत सरकारने १९९५ पासून सुरू केलेल्या पल्स पोलिओ अभियानामुळे देशाला २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळाला. हा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
याचबरोबर जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून विविध उपक्रमही राबविण्यात आले. “हिवताप दूरीकरण धोरण २०३०” अंतर्गत किटकशास्त्रीय सर्वेक्षण, डासोत्पत्ती नियंत्रण, गप्पी माशांचे महत्त्व, परिसर स्वच्छता, मच्छरदाण्यांचा वापर तसेच जलजन्य व किटकजन्य आजारांपासून बचाव याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
“पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब द्या” आणि “पोलिओमुक्त भारत, आपली सर्वांची जबाबदारी” या घोषणांसह “पोलिओमुक्त मारवड – आरोग्यसंपन्न मारवड” हा संकल्प करण्यात आला.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. साहील चौधरी, डॉ. विद्या देवरे, आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे, संजय जाधव, प्रयोगशाळा वैज्ञानिक के. आर. साबळे, आरोग्य सहायिका सुनिता गावित, आरोग्य सेवक योगेश कापडणे तसेच आशा सेविका राजेश्री पाटील, संगीता चौधरी, मंदाताई शिंदे, मनीषा पाटील, कल्याणी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
आरोग्य विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, रविवार, २८ जून रोजी आपल्या परिसरातील पल्स पोलिओ केंद्रावर जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत. हेच आपल्या गावाला खऱ्या अर्थाने आरोग्यसंपन्न व पोलिओमुक्त बनविण्याचे प्रभावी पाऊल ठरेल.



