पत्रकारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी,  व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे अमळनेर पोलिसांना निवेदन; गुन्हा दाखल  करा व पत्रकार परिषदांवर बहिष्काराचा इशारा
1 min read

पत्रकारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी, व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे अमळनेर पोलिसांना निवेदन; गुन्हा दाखल करा व पत्रकार परिषदांवर बहिष्काराचा इशारा

Loading

पत्रकारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे अमळनेर पोलिसांना निवेदन;  गुन्हा दाखल करा व पत्रकार परिषदांवर बहिष्काराचा इशारा

अमळनेर प्रतिनिधी :
शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात विभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, व्हॉईस ऑफ मीडिया ही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, वेब, रेडिओ, साप्ताहिक, मासिक, छायाचित्रकार, कॅमेरामन, युट्यूब, सोशल मीडिया तसेच स्वतंत्र पत्रकारांना एकत्र आणणारी आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून भारतासह ७८ देशांमध्ये पत्रकारांचे हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकार संरक्षण कायदा आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे.
संघटनेने स्पष्ट केले की, पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासन, प्रशासन आणि जनतेमधील विश्वासाचा महत्त्वाचा दुवा आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे, लोकहिताचे प्रश्न मांडणे आणि सत्य घटनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हे पत्रकारांचे घटनात्मक व नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे पत्रकारांचा अवमान हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राचा आणि लोकशाही व्यवस्थेचाच अपमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, एखाद्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी अवमानकारक भाषा वापरणे ही लोकशाही मूल्यांना धक्का देणारी बाब आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पत्रकारांवर मानसिक दबाव निर्माण होतो, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो आणि मुक्त, निर्भीड पत्रकारितेच्या वातावरणावर विपरीत परिणाम होतो.

मुख्य मागण्या

व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमने शासन व पोलिस प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत –

खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित अपमानास्पद वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.

त्यांनी संपूर्ण पत्रकार बांधवांची जाहीर व लेखी बिनशर्त माफी मागावी.

लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या वर्तनाची चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.

पत्रकारांचा अवमान करणाऱ्यांविरोधात शासनाने कठोर धोरण जाहीर करावे.

राज्यात पत्रकार संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत खासदार संजय दिना पाटील व शिंदे गटाच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

पत्रकारांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.
निवेदनात पुढे इशारा देण्यात आला आहे की, या प्रकरणात न्याय न मिळाल्यास व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल. पत्रकारांचा सन्मान हा लोकशाहीचा सन्मान असून पत्रकारांवरील शाब्दिक, मानसिक किंवा शारीरिक हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. पत्रकारांच्या स्वाभिमानाचे व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी संघटना शेवटपर्यंत संघर्ष करेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष उमेश काटे, शहराध्यक्ष जयंतराव वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय सोनार, संजय सूर्यवंशी, जयेशकुमार काटे, विवेक पाटील, भाऊसाहेब देशमुख,प्रसिद्धी प्रमुख बापूराव ठाकरे, ईश्वर महाजन, निरंजन पेंढारे, दयाराम पाटील, संजय पाटील, भरत पाटील, रजनीकांत पाटील आदी पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *