अमळनेरमध्ये दिव्यांग शिक्षणाला नवी उभारी; आधुनिक निवासी विद्यालयाचे लोकार्पण उत्साहात ,राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध सुविधांचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना गणवेश व स्टेशनरीचे वाटप
![]()
अमळनेरमध्ये दिव्यांग शिक्षणाला नवी उभारी; आधुनिक निवासी विद्यालयाचे लोकार्पण उत्साहात
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध सुविधांचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना गणवेश व स्टेशनरीचे वाटप
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील आर. के. नगर येथे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाच्या नव्या आधुनिक वास्तूचे लोकार्पण शुक्रवारी (दि. २६ जून) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून झालेल्या या कार्यक्रमाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, पुनर्वसन आणि सर्वांगीण विकासासाठी नवे पर्व सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज तसेच इतर महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पी. एस. म्हस्के यांच्या शुभहस्ते नव्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगर परिषद शिक्षण सभापती नावेद अहमद मुर्शिद शेख यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले.
या प्रसंगी विविध विभागांचेही मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सौ. संदानशिव यांच्या हस्ते फिजिओथेरपी कक्ष, विश्वनाथ पितांबर पाटील यांच्या हस्ते शीघ्र निदान व हस्तक्षेप केंद्र, नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या हस्ते पूर्व प्राथमिक विभाग, अभिषेक विनोद पाटील यांच्या हस्ते क्रीडा विभाग, प्रताप छबुलाल साळी यांच्या हस्ते रिक्रिएशन हॉल, आरोग्य सभापती रामकृष्ण बापूराव पाटील यांच्या हस्ते वसतीगृह तसेच नगरसेविका निलिमा विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते स्वयंपाकगृहाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक महेशबापू देशमुख,सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील, नगरसेवक रामकृष्ण पाटील, प्रताप साळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. तसेच गणेश मॅटरनिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रसन्न जोशी व डॉ. उर्वी प्रसन्न जोशी यांचा विशेष अतिथी म्हणून सत्कार करण्यात आला.
भगवान तलवारे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सौ. अर्चना पाटील यांनी संस्थापक अध्यक्ष डॉ. भगवानजी तलवारे (मराठे) यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यालय उभारून समाजसेवेचे व्रत त्यांनी जपल्याचे त्यांनी सांगितले.
‘शाहू महाराजांच्या जयंतीदिनी विद्यालयाचा शुभारंभ हा प्रेरणादायी योग’
शिक्षण सभापती नावेद शेख यांनी मनोगतात सांगितले की, “राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यालयाची सुरुवात होणे हा अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक योग आहे. समाजातील वंचित घटकांसाठी असे उपक्रम अधिकाधिक उभे राहणे ही काळाची गरज आहे.”
भगवान तलवारे यांचा साधेपणा ठरला चर्चेचा विषय
कार्यक्रमातील विशेष बाब म्हणजे संस्थेचे अध्यक्ष डॉ. भगवानजी तलवारे यांनी व्यासपीठावर न बसता सर्वसामान्य पाहुण्यांमध्ये बसून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यांचा हा साधेपणा आणि सेवाभाव उपस्थितांच्या विशेष चर्चेचा विषय ठरला. विविध मान्यवरांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
विद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थी, पालक, नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन युवराज चौधरी यांनी केले. शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नागरिकांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण
फिजिओथेरपी, शीघ्र निदान व हस्तक्षेप केंद्र, सुसज्ज वसतीगृह, क्रीडा विभाग, रिक्रिएशन हॉल, पूर्व प्राथमिक विभाग आणि आधुनिक स्वयंपाकगृह अशा सर्व सुविधांनी सुसज्ज असलेली ही नवी वास्तू दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, पुनर्वसन आणि स्वावलंबनासाठी मोलाची ठरणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी, या विचाराला बळ देणारा हा उपक्रम अमळनेरच्या सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल.
काही क्षणचित्रे










