चोपडा तालुक्यात २८ जूनला ‘पल्स पोलिओ’ मोहीम; २९ हजार बालकांना मिळणार सुरक्षा कवच. , २७४ बूथवर ७५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती; एकही बालक सुटणार नाही: आरोग्य विभागाचा संकल्प
![]()
चोपडा तालुक्यात २८ जूनला ‘पल्स पोलिओ’ मोहीम; २९ हजार बालकांना मिळणार सुरक्षा कवच.
२७४ बूथवर ७५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती; एकही बालक सुटणार नाही: आरोग्य विभागाचा संकल्प
चोपडा प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या सूचनेनुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी विशेष पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी आणि नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आरोग्य विभाग या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे.
२७४ बूथवर मोफत डोस
या मोहिमेअंतर्गत चोपडा तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय रुग्णालये, बस स्थानक अशा प्रमुख ठिकाणी एकूण २७४ बूथ उभारण्यात आले आहेत. ७५७ आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या मदतीने नुकत्याच जन्मलेल्या बालकापासून ते ५ वर्षांपर्यंतच्या एकूण २९,६९६ बालकांना एकाच दिवशी पोलिओचे मोफत डोस दिले जाणार आहेत. यात ग्रामीण भागातील २०,७२१ आणि चोपडा शहरातील ८,९७५ बालकांचा समावेश आहे.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तगडी फौज
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य केंद्राचे ५८ सुपरवायझर तैनात करण्यात आले आहेत. तसेच, जिल्हास्तरावरून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांची टीम तर तालुकास्तरावरून ८ पर्यवेक्षक या संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवतील व पर्यवेक्षण करणार आहेत.
वरिष्ठ अधिकारी यांचे मार्फत “पल्स पोलिओ मोहिमेच्या” पूर्वतयारीसाठी.. ग्रामीण व शहरी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या व नागरी आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि सर्व आशा स्वयसेविका यांचे प्रत्यक्षात तथा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा प्रशिक्षण घेण्यात आले आहेत.
वय ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे सर्वेक्षण करून घेण्यात येऊन त्यांच्या अपेक्षित याद्या देखील तयार करण्यात आलेल्या आहेत.
बाळ आजारी असले तरी डोस पाजा !
महत्त्वाचे आकडे आणि मोहिमेचे सुष्म नियोजन:
एकूण उद्दिष्ट: २९,६९६ बालके (० ते ५ वर्षे वयोगट)
ग्रामीण भाग: २०,७२१ बालके | शहरी भाग: ८,९७५ बालके
एकूण पोलिओ बूथ: २७४ (प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, बस स्थानक इ.)
तैनात कर्मचारी: ७५७ (आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका)


पर्यवेक्षण: ५८ केंद्र सुपरवायझर, ८ तालुका पर्यवेक्षक आणि १५ जिल्हास्तरीय निरीक्षक.
तालुक्यातील २९,६९६ बालकांना १००% पोलिओ डोस देण्याचे मुख्य लक्ष्य.
“२८ जूनला बूथवर डोस न घेऊ शकलेल्या बालकांसाठी नंतर गृहभेट दिली जाईल (ग्रामीण भागात ३ दिवस, तर शहरी भागात ५ ते ७ दिवस).
तालुक्यातील दुर्गम भाग, डोंगराळ भाग, मळे व पाड्यांवरील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेला कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
बाळ आजारी असले तरीही पोलिओचा डोस पूर्णपणे सुरक्षित असून तो अवश्य पाजावा.”
— डॉ. गिरीश गोसावी (तालुका आरोग्य अधिकारी, चोपडा)
हुकल्यास गृहभेट:
२८ जूनला जे बालक बूथवर येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी ग्रामीण भागात पुढील ३ दिवस तर शहरी भागात ५ ते ७ दिवस ‘घरोघरी भेट’ (IPPI) देऊन डोस पाजण्यात येईल. “दोन थेंब जीवनाचे” देऊन आपल्या बालकाला अपंगत्वापासून वाचवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, डॉ. रमेश धापते व डॉ. गिरीश गोसावी, डॉ.चंद्रकांत बारेला यांनी केले आहे.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य सहाय्यक- विजय देशमुख, हिवताप पर्यवेक्षक-जगदीश बाविस्कर यांच्यासह उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तक आणि आशा सेविका परिश्रम घेत आहेत.

