खड्ड्यांच्या विळख्यात मांडळ–मुडी–वावडे मार्ग; सरपंचांचा उपोषणाचा इशारा, ग्रामस्थ आक्रमक रस्ता नव्याने मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याची मागणी
![]()
खड्ड्यांच्या विळख्यात मांडळ–मुडी–वावडे मार्ग; सरपंचांचा उपोषणाचा इशारा, ग्रामस्थ आक्रमक
रस्ता नव्याने मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याची मागणी
अमळनेर प्रतिनिधी :
मांडळ ते मुडी तसेच मांडळ ते वावडे या मार्गांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.
या रस्त्यालगत हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करावी लागत आहे. विशेषतः अशोक लखा कोळी यांच्या घराजवळील मोठ्या खड्ड्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या गंभीर समस्येबाबत सरपंच दीपक बडगुजर, माजी सरपंच विजय पाटील, माजी सरपंच सुरेश कोळी, अण्णा पाटील तसेच ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, अमळनेर यांना दिलेल्या निवेदनात मांडळ–मुडी व मांडळ–वावडे हे दोन्ही रस्ते नव्याने तयार करण्यासाठी तातडीने मंजुरी देऊन काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून अनेक मागण्यांनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांसाठी सरपंच दीपक बडगुजर यांनी उपोषणाचा इशारा दिला असून, प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या मते, हा प्रश्न केवळ रस्त्याचा नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा, शेतकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीचा आणि ग्रामीण विकासाशी निगडित असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे. आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवते की आंदोलनाची वाट पाहते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.


