जानवेच्या तुषार पाटीलची यशस्वी झेप; गावाला मिळाला पहिला वकील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली
![]()
जानवेच्या तुषार पाटीलची यशस्वी झेप; गावाला मिळाला पहिला वकील
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली
अमळनेर (प्रतिनिधी) : जानवे येथील लोकनियुक्त सरपंच सौ. सरला प्रकाश पाटील व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश विक्रम पाटील (वकील बाबा) यांचे सुपुत्र तुषार प्रकाश पाटील याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नाशिक येथील म.वि.प्र. समाजाच्या लॉ कॉलेजमधून B.A.LL.B. पदवी यशस्वीरीत्या संपादन करून एलएलबी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशामुळे जानवे गावातून पहिला वकील होण्याचा मान त्याने मिळवला आहे.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तुषारने कठोर परिश्रम, अभ्यासू वृत्ती, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर हे यश प्राप्त केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तुषारच्या यशाबद्दल साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, जानवे यांच्या वतीने वाचनालयाचे अध्यक्ष डी. एम. पाटील सर यांनी त्याचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी उपस्थितांनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, तुषारचे वडील प्रकाश पाटील हे जानवे परिसरात प्रेमाने “वकील बाबा” या नावाने ओळखले जातात. मात्र आता त्यांच्या चिरंजीवाने प्रत्यक्ष कायद्याचे शिक्षण पूर्ण करून खऱ्या अर्थाने वकील बनण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे पाटील परिवारासह संपूर्ण जानवे गावासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.
तुषार प्रकाश पाटील याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

