झाडांचा वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!  शिरुडच्या व्ही. झेड. पाटील हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम; वृक्षप्रेमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवेदनशीलतेची रुजवण
1 min read

झाडांचा वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश! शिरुडच्या व्ही. झेड. पाटील हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम; वृक्षप्रेमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवेदनशीलतेची रुजवण

Loading

झाडांचा वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

शिरुडच्या व्ही. झेड. पाटील हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम; वृक्षप्रेमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवेदनशीलतेची रुजवण

अमळनेर प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाची केवळ जनजागृती न करता ती प्रत्यक्ष कृतीतून जोपासण्याचा आदर्श व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घालून दिला. शाळेच्या मैदानातील वृक्षांचा दुसरा वाढदिवस केक कापून आणि वृक्षपूजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, आपुलकी आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

शाळेच्या मैदानात लावण्यात आलेली झाडे विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून जपली असून, यापूर्वीही झाडांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यंदा दुसऱ्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी झाडांना फुगे बांधून तसेच विविध पद्धतीने परिसर सुशोभित करून आपला उत्साह व्यक्त केला.

१०० वृक्षांचे दोन वर्षांपासून संवर्धन

दोन वर्षांपूर्वी स्पार्क इरिगेशन्सचे झोनल श्री. कुणाल गिरासे आणि सप्तशृंगी इरिगेशन्सचे श्री. बापूराव महाजन यांच्या तर्फे शाळेला सुमारे १२ फूट उंचीची १०० वृक्षांची रोपे देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी या वृक्षांचे सातत्याने संगोपन करून त्यांना जगवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यामागे विद्यार्थ्यांच्या श्रमांची आणि पर्यावरणाप्रती असलेल्या जिव्हाळ्याची भावना दिसून आली.

या उपक्रमाची संकल्पना पर्यावरणप्रेमी डी. ए. धनगर यांची होती. वृक्षांचे केवळ रोपण न करता त्यांचे संवर्धन करणे आणि पुढील पिढीला पर्यावरणाची जाणीव करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश

वृक्षांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून वृक्षांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला.

या प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीच्या चेअरमन श्रीमती पुष्पलता अशोक पाटील, शालेय समिती सदस्य श्री. पुंजू एकोबा पाटील, श्री. वसंत भगवान पाटील, श्री. रामलाल हिम्मत पाटील, तसेच श्री. डी. ए. धनगर सर, श्री. दिलीप पाटील सर, श्री. अरविंद बाविस्कर सर, श्री. विजय बोरसे, श्री. अतुल सोनवणे आणि श्री. अनिकेत सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. डी. अहिरे सर, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन मुख्याध्यापक व चित्रकला शिक्षकांचा सत्कार

यावेळी शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक श्री. जे. डी. अहिरे तसेच ग्रामीण भागात चित्रकला परीक्षा सुरू केल्याबद्दल चित्रकला शिक्षक श्री. भूषण सोनवणे यांचा शालेय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब बोरसे सर व धिरज पाटील यांनी केले, तर देशमुख मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याच्या या अभिनव उपक्रमातून वृक्षांप्रती जिव्हाळा, पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आणि निसर्गाशी मैत्रीचा सुंदर संदेश दिला. शाळेच्या परिसरात घुमलेला “झाडे लावा, झाडे जगवा!” हा संदेश उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *