नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख
![]()
नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख
नंदुरबार, प्रतिनिधी :
नोबेल फाउंडेशन जळगाव आणि ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एक ऐतिहासिक शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न झाली. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा (ISRO) प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
प्रशासकीय अधिकारी अजय खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनतर्फे आणि राज्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था नोबेल फाउंडेशनच्या सहकार्याने केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून इस्रोची शैक्षणिक सहल घडवून आणण्यात आली.
या सहलीत एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन सेंटर येथे भेट देऊन भारतीय अंतराळ संशोधनाच्या वाटचालीची सखोल माहिती जाणून घेतली. यावेळी इस्रोचे शास्त्रज्ञ सावन लाखिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना विज्ञान, संशोधन आणि अंतराळ क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना सावन लाखिया म्हणाले, “मोठी स्वप्ने, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणताही विद्यार्थी इस्रोमध्ये स्थान मिळवू शकतो आणि देशसेवेचे महान कार्य करू शकतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या संघर्षमय जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी.” त्यांनी यावेळी नोबेल फाउंडेशन आणि ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनच्या उपक्रमांचेही विशेष कौतुक केले.
इस्रो भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगशाळा, अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित प्रदर्शने आणि संशोधनविषयक माहिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी साबरमती आश्रम येथे भेट देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा अभ्यास केला.
या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी अहमदाबाद सायन्स सिटीलाही भेट दिली. येथे स्पेस टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, ह्युमन डेव्हलपमेंट, विज्ञान प्रदर्शने तसेच अक्वॅटिक पार्कचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या आधुनिक विश्वाची ओळख करून घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर संधी आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील संभाव्य वाटांबाबत जयदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाबाबत माहिती देताना आयआरएस अधिकारी अजय खर्डे म्हणाले, “नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास हे विद्यार्थी स्वतःच्या बळावर नवा इतिहास घडवू शकतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, कौशल्ये आणि क्षमता शोधून त्यांचा विकास करण्यासाठी ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील.”


प्रतिक्रिया व्यक्त करताना जयदीप पाटील म्हणाले, “नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी अत्यंत मेहनती, जिद्दी आणि गुणवंत आहेत. शालेय जीवनातच त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींची ओळख करून दिल्यास या आदिवासी भागातून भविष्यात अनेक शास्त्रज्ञ, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ घडू शकतात.”
या शैक्षणिक सहलीमध्ये वेलीमाता आश्रम शाळेचे सहा विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. संपूर्ण इस्रो दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मण पावरा, रमेश पाटील आणि विरेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या उपक्रमाला अजय खर्डे आणि डॉ. कांतिलाल ताटिया यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेची भेट घडवून आणणारा हा उपक्रम जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी टप्पा ठरला असून, भविष्यात अशा उपक्रमांतून अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

