वक्ता हा जन्मत नाही, घडविला जातो” — प्रा. डॉ. राहुल निकम , राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त युवा वक्त्यांची प्रेरणादायी कार्यशाळा संपन्न
![]()
“वक्ता हा जन्मत नाही, घडविला जातो” — प्रा. डॉ. राहुल निकम
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त युवा वक्त्यांची प्रेरणादायी कार्यशाळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने युवा वक्त्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सुमारे १०० युवा वक्त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध शाळांमध्ये जाऊन भाषणे देण्याचा संकल्प केला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राहुल निकम म्हणाले की, “वक्ता हा जन्मत नाही तर घडविला जातो. प्रभावी वक्तृत्वासाठी सातत्यपूर्ण वाचन, चिंतन, अभ्यास आणि सराव आवश्यक असतो.” त्यांनी युवा वक्त्यांना आत्मविश्वास, विचारांची मांडणी आणि समाजप्रबोधनातील वक्तृत्वाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनीही प्रभावी मार्गदर्शन करत राजर्षी शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले, तर डी. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमात सुनिता मोरे यांनी लिहिलेले राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावरील गीत अनिता संदानशिव, भारती कोळी, माधुरी पाटील, निवेदिता कापडणेकर आणि डी. ए. पाटील यांनी सादर करून वातावरण प्रेरणादायी केले.
यावेळी सोपान भवरे लिखित ‘राजर्षी शाहू महाराज : जीवन व कार्य’ हे वाचन साहित्य सर्व युवा वक्त्यांना वितरित करण्यात आले. कार्यशाळेला युवा वक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी मुख्याध्यापिका अनिता बोरसे, रामेश्वर भदाणे, अशोक बिऱ्हाडे, संजय पाटील, चंद्रकांत देसले, प्रा. सुनील वाघमारे, बापूराव ठाकरे, मिलिंद निकम, अशोक केशवराव पाटील, अतुल डोळस, अजय भामरे, सुनील वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
राजर्षी शाहू महाराजांचे विचार घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प या कार्यशाळेच्या माध्यमातून युवा वक्त्यांना सामाजिक बांधिलकी, लोकसेवा आणि सत्यशोधक विचारांची प्रेरणा देण्यात आली. आगामी काळात हे युवा वक्ते विविध शाळांमध्ये जाऊन राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा जागर करणार आहेत.

