आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; अमळनेर–गडखांब–पातोंडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मंजुरी
![]()
आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; अमळनेर–गडखांब–पातोंडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मंजुरी
अमळनेर प्रतिनिधी–तालुक्यातील चोपडा मार्गावरील गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा या उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्गाच्या काँक्रिटीकरणाला मान्यता मिळाली असून, त्यासाठी कोट्यवधींचा (172 कोटी)निधीही मंजूर झाला आहे अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
दीर्घकाळापासून या रस्त्याच्या उन्नतीकरणाची मागणी होत होती. अखेर आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शासनाने निधी मंजूर केल्याने हा मार्ग सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित, टिकाऊ आणि वेगवान वाहतुकीसाठी सक्षम होणार आहे. अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल तसेच धुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल. व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठीही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.यानिमित्ताने अनेक तालुके जलद गतीने एकमेकांशी जोडले जाणार आहेत.
अमळनेर–गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणण्यात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाढती वाहतूक, रस्त्याची झालेली दुरवस्था आणि अपघातांच्या घटना लक्षात घेऊन रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी जोर धरत होती. विविध स्तरांवर बैठका, निवेदने आणि पाठपुराव्यानंतर अखेर या महत्त्वाच्या मार्गासाठी निधी मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा मार्ग केवळ स्थानिक वाहतुकीसाठीच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील विविध शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने, शेतमाल वाहतूक करणारी वाहने तसेच प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. मात्र, रस्त्याची अवस्था खराब असल्याने आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना वेळेचा आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. आता काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारेल आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे धरणगाव ते चोपडा या मार्गाचे काम आधीच सुरू झाले आहे. त्यानंतर आता धरणगाव फाटा ते अमळनेर या महत्त्वाच्या टप्प्यालाही मंजुरी मिळाल्याने धुळे–अमळनेर–चोपडा तसेच धरणगावकडे जाणारा मार्ग अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी धुळे ते चोपडा व्हाया अमळनेर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. फागणे ते अमळनेर या मार्गाचे रुंदीकरण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता धुळेपासून अमळनेरपर्यंतचा रस्ता अधिक सक्षम बनला आहे. त्यात नव्याने मंजूर झालेल्या अमळनेर ते धरणगाव फाटा दरम्यानच्या काँक्रिटीकरणाची भर पडल्याने या संपूर्ण मार्गाची क्षमता आणखी वाढणार आहे. यावल, चोपडा, धरणगाव आणि अमळनेर या भागांतील नागरिकांसाठी धुळे शहराशी संपर्क अधिक सुलभ होणार असून, पुढे नाशिक, कल्याण आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार आहे.
सुमारे १७२ कोटी रुपये निधीतून होणाऱ्या अमळनेर–गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. केळी, कापूस, मका, भाजीपाला आणि इतर शेतमालाची वाहतूक जलदगतीने करता येणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. तसेच औद्योगिक मालवाहतूक, बांधकाम साहित्याची वाहतूक आणि व्यावसायिक व्यवहारांना चालना मिळणार आहे. चांगल्या रस्त्यांमुळे गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. काँक्रिट रस्त्यांचे आयुष्य डांबरी रस्त्यांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे वारंवार दुरुस्तीची आवश्यकता कमी राहते आणि शासनाचाही देखभाल खर्च कमी होतो. पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या निर्माण होत नसल्याने अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. वाहनचालकांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील रस्ते जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
सदर मंजुरी बद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, ना सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे आभार व्यक्त केले आहेत

