आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
![]()
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा
श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या विद्यालयात २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करणे, खेळांविषयी आवड वाढविणे आणि ऑलिम्पिक चळवळीचे महत्त्व पटवून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी होत्या. यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती आठवले, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका सौ. आर. एस. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर तसेच सौ. एस. एस. देवरे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भारतीय हॉकीचे जादूगार आणि देशाला गौरव प्राप्त करून देणारे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले. यानंतर ऑलिम्पिक मशाल प्रज्वलित करून दिवसाची सुरुवात करण्यात आली.
या निमित्ताने विद्यालयात जम्प रोप (दोरीउडी) व धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून क्रीडाभावनेचे दर्शन घडविले.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी मॅडम म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन प्रथम २३ जून १९४८ रोजी साजरा करण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धा ही जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा असून ती दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. ‘हलका, शिका आणि शोधा’ या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित असलेला ऑलिम्पिक दिन निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि जागतिक बंधुभावाचा संदेश देतो. भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करावे आणि भारताने अधिकाधिक पदके जिंकावीत, या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी आवड निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संयोजन व नियोजन पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी खेळांमुळे क्रीडाभावना, मैत्री, शिस्त आणि विविध संस्कृतींचा आदर जोपासला जात असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे चेअरमन श्री. जितेंद्रभाऊ जैन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करण्याची सामूहिक शपथ यावेळी घेतली.


