जि.प. शाळेत प्रवेश घ्या; घरपट्टी मी भरणार!  अंतुर्ली-रंजाणेचे सरपंच सचिन पाटील यांचा अभिनव उपक्रम; ग्रामीण शिक्षणाला नवी उभारी
1 min read

जि.प. शाळेत प्रवेश घ्या; घरपट्टी मी भरणार! अंतुर्ली-रंजाणेचे सरपंच सचिन पाटील यांचा अभिनव उपक्रम; ग्रामीण शिक्षणाला नवी उभारी

Loading

जि.प. शाळेत प्रवेश घ्या; घरपट्टी मी भरणार!

अंतुर्ली-रंजाणेचे सरपंच सचिन पाटील यांचा अभिनव उपक्रम; ग्रामीण शिक्षणाला नवी उभारी

अमळनेर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकवून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी अंतुर्ली-रंजाणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सचिन बाळू पाटील यांनी एक अनोखा आणि समाजहिताचा निर्णय घेतला आहे. आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देणाऱ्या पालकांची घरपट्टी स्वतःच्या खर्चातून भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक चर्चा रंगली आहे.
आज अनेक ठिकाणी खासगी शिक्षण संस्थांच्या वाढत्या जाळ्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत आहे. अशा परिस्थितीत गावाचा विकास केवळ रस्ते, गटारी किंवा भौतिक सुविधांपुरता मर्यादित नसून शासकीय मराठी शाळा टिकणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा विचार सचिन पाटील यांनी मांडला आहे.
त्यांच्या मते, जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही विद्यार्थ्यांना संस्कार, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी अशा शाळांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे गावातील मुलांनी गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे, यासाठी आवश्यक त्या सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत ग्रामपंचायतीतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शुद्ध आरओ पाणी उपलब्ध करून देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांचा विश्वास वाढून पटसंख्येत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील किरण भरतराव शिसोदे (बाळा मास्तर) यांनीही प्रेरणादायी पुढाकार घेतला आहे. डांगरी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या दुसरी ते चौथी इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाच पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी कै. भरतराव पंडितराव शिसोदे यांच्या स्मरणार्थ स्वतः भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. संबंधित पावतीही पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी सचिन पाटील आणि किरण शिसोदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांबाबत नव्याने आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचा आदर्श इतर लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन आमदार अनिल दादा पाटील, नगरसेविका जयश्री ताई पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूतसह
राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मित्रपरिवार यांनी केले आहे.

चौकट

“घरपट्टी माफ करण्याची तरतूद शासन नियमांत नसल्याने मी ती स्वतःच्या खर्चातून भरणार आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी आणि ग्रामीण शिक्षण मजबूत व्हावे, हीच भूमिका आहे.”
— सचिन बाळू पाटील, लोकनियुक्त सरपंच, अंतुर्ली-रंजाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *