दूषित पाणीपुरवठ्याचे कारण अखेर समोर; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम थेट जलकुंभात उतरले
![]()
दूषित पाणीपुरवठ्याचे कारण अखेर समोर; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम थेट जलकुंभात उतरले
कोर्ट परिसरातील पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ आढळला; स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजनांचे आदेश
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर शहरातील दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असताना उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी प्रत्यक्ष जलकुंभाची पाहणी करून समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. कोर्ट परिसरातील पाण्याच्या टाकीची तपासणी करताना त्यांनी स्वतः टाकीत उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी टाकीच्या तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आढळून आला असून दूषित पाणीपुरवठ्याचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात आलेल्या या पाहणीत टाकीतील साचलेला गाळ, घाण आणि स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याची बाबही यावेळी अधोरेखित झाली.
उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जलकुंभांची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या असून शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या आणि जलसाठा केंद्रांची नियमित तपासणी व स्वच्छता करण्याबाबत निर्देश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम तसेच सत्ताधारी पक्षातील सर्व नगरसेवक शहरातील नागरिकांना वेळेवर आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या या धाडसी आणि लोकहितवादी कृतीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नाची प्रत्यक्ष टाकीत उतरून पाहणी करत त्यांनी आपल्या कार्यतत्परतेचा परिचय दिला आहे. शहरातील मूलभूत सुविधांबाबत ते सातत्याने जागरूक राहून काम करत असल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याची सकारात्मक चर्चा सुरू आहे.
“नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून दर्जेदार सेवा देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे,” असे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी सांगितले.

