स्व. रक्षा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जि.प. शिरुड शाळेला वॉटर कुलरची भेट माजी विद्यार्थी अण्णासाहेब साहेबराव पाटील यांचे सामाजिक योगदान; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली काळजी
![]()
स्व. रक्षा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जि.प. शिरुड शाळेला वॉटर कुलरची भेट
माजी विद्यार्थी अण्णासाहेब साहेबराव पाटील यांचे सामाजिक योगदान; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली काळजी
अमळनेर प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरुड येथील विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने शिरुड विकास मंचचे सदस्य तथा शाळेचे माजी विद्यार्थी, उद्योगप्रिय व्यक्तिमत्त्व अण्णासाहेब श्री. साहेबराव पंडित पाटील व सौ. शुभांगी साहेबराव पाटील यांनी त्यांच्या कन्या स्व. रक्षा साहेबराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला सुमारे ३२ हजार रुपये किमतीचे वॉटर कुलर मशीन सप्रेम भेट दिले.
शाळेतील एक्वा फिल्टर प्लांटला जोडण्यात येणाऱ्या या वॉटर कुलरमुळे विद्यार्थ्यांना वर्षभर स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून विशेषतः गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ही भेट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिरुड विकास मंचच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणाविषयी तळमळ असलेले मंचचे सदस्य व माजी विद्यार्थी शाळेसाठी सढळ हाताने मदत करत असून गावातील पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ यांचाही या कार्याला भक्कम पाठिंबा लाभत आहे.
या सामूहिक प्रयत्नांमुळे शाळेत डिजिटल शिक्षण, विविध भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. वॉटर कुलरच्या स्वरूपातील ही मदत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी अण्णासाहेब पाटील व त्यांच्या परिवाराचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “दत्तप्रभूंच्या कृपेने आपल्या हातून अशीच समाजसेवा अखंडपणे घडत राहो आणि आपणास निरामय आरोग्य लाभो,” अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

