सन्मान, नियोजन आणि हिंदी संवर्धनाचा संकल्प; अमळनेर तालुका हिंदी मंडळाची सहविचार सभा संपन्न
![]()
सन्मान, नियोजन आणि हिंदी संवर्धनाचा संकल्प; अमळनेर तालुका हिंदी मंडळाची सहविचार सभा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका हिंदी मंडळाच्या वतीने आयोजित सहविचार सभा व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी राष्ट्रभाषा शिक्षक, माध्यमिक विद्यालय मंगरूळ, साने गुरुजी पतपेढीचे संचालक तथा अमळनेर तालुका हिंदी मंडळाचे अध्यक्ष मा. राजेंद्र पाटील यांची अमळनेर तालुका शिक्षक सेना तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सहपत्निक शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमात राष्ट्रभाषा शिक्षिका, माध्यमिक विद्यालय लोण, साने गुरुजी पतपेढीच्या संचालिका तसेच अमळनेर तालुका हिंदी मंडळाच्या खजिनदार सौ. प्रतिभा देवराम पाटील यांना मिळालेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच डी.आर. कन्या शाळेच्या हिंदी व स्काऊट शिक्षिका व हिंदी अध्यापक मंडळाच्या उपाध्यक्षा योगेश्री पाटील यांना चेन्नई येथे प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी तिन्ही मान्यवरांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ हिंदी शिक्षक तथा अमळनेर तालुका हिंदी मंडळाचे सचिव दिलीप पाटील होते. प्रारंभी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून हिंदी मंडळाचा नावलौकिक वाढविणाऱ्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यानंतर १४ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या हिंदी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच तालुकास्तरावर सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. ही परीक्षा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांत तसेच शहर व ग्रामीण विभागानुसार घेण्याचा निर्णय चर्चेत मांडण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाटप करण्यात आले.
यावेळी हिंदी अध्यापक मंडळाचे सभासद वाढविणे, मंडळाचे शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबाबत आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यावरही चर्चा झाली.
बैठकीस जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा निंभोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक
एन. आर. चौधरी, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्षा योगेश्री पाटील, सचिव दिलीप पाटील, खजिनदार प्रतिभा जाधव, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन, सदस्य प्रदीप चौधरी, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती अविनाश मोरे, परमेश्वर पाटील, कविता पाटील ,मंगला पाटील यांची होती.
कार्यक्रमाचा समारोप प्रदीप चौधरी यांनी आभार प्रदर्शन करून केला. हिंदी भाषा संवर्धन, शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



