मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*, *शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेले रुग्ण वाहनाद्वारे पनवेल येथे रवाना*
![]()
*मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*
*शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेले रुग्ण वाहनाद्वारे पनवेल येथे रवाना*
*अमळनेर* : येथील मंगळग्रह सेवा संस्था, मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी आयोजित भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना नेत्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.
शिबिरादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. विजय बामणे, डॉ. गुरुप्रीत सिंग, डॉ. राहुल पाटील, डॉ. भूपेंद्र वाघ यांच्यासह निशा शिंदे व प्राची गायकवाड यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. एकूण ७३ नागरिकांनी शिबिरात सहभाग नोफ्लदविला. सखोल वैद्यकीय तपासणीनंतर ३९ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदी पूर्ण करण्यात आल्या. तत्पूर्वी नेत्रतज्ज्ञांचा रुग्णांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने पात्र ठरलेल्या सर्व रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची वाहन व्यवस्था करण्यात आली. हे सर्व रुग्ण दुपारी साडेचार वाजता श्री मंगळग्रह मंदिरातून पनवेलकडे रवाना झाले. शस्त्रक्रियेसह आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि पुढील उपचारांची व्यवस्था संबंधित रुग्णालयामार्फत करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी तसेच वैद्यकीय पथक यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही अशा सामाजिक उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशाच आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
समाजातील दुर्बल घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्था सातत्याने कार्यरत आहे. त्या अनुषंगाने दर महिन्यातील तिसऱ्या रविवारी भव्य मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले जाते. भविष्यातही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविणे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूच राहतील, असे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.

