योगातून निरोगी जीवनाचा संदेश; माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा, मुख्याध्यापक डी. डी. इंशुलकर यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांनी सादर केली विविध योगासने व प्राणायाम
![]()
योगातून निरोगी जीवनाचा संदेश; माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
मुख्याध्यापक डी. डी. इंशुलकर यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांनी सादर केली विविध योगासने व प्राणायाम
रणाईचे | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. २१ जून रोजी येथील माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे योग दिन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. इंशुलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व योगशास्त्राचे जनक मानल्या जाणाऱ्या पतंजली ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात योगाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्य सुदृढ राहते, मानसिक एकाग्रता वाढते तसेच सकारात्मक जीवनशैलीचा विकास होतो, असे त्यांनी सांगितले.
यानंतर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. व्ही. एस. कापडणीस यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार, ताडासन, पद्मासन, वज्रासन यांसारखी विविध योगासने शिस्तबद्ध पद्धतीने केली. तसेच ध्यानधारणेचा सराव करून मानसिक शांतता आणि आत्मनियंत्रणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
या कार्यक्रमास श्री. पी. डी. पाटील, श्री. व्ही. एस. कापडणीस, श्रीमती एस. आर. पाटील, श्रीमती आर. ए. पाटील, श्री. डी. व्ही. देसले, विद्यालयाचे लिपिक श्री. एल. व्ही. पाटील, शिपाई श्री. जी. टी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने तसेच “करो योग, रहो निरोग” या घोषणेद्वारे करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. योगाच्या माध्यमातून निरोगी व सुदृढ जीवनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात या उपक्रमाला यश आले.

