श्री मंगळग्रह मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा विविध योगप्रकारांचा सराव; आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
विविध योगप्रकारांचा सराव; आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
अमळनेर, प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवार (दि. २१ जून) रोजी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी तसेच मंदिरातील सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगप्रकारांचा सराव केला.
शिबिराची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली. यानंतर योग मार्गदर्शक तथा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम आणि खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि श्वसनक्रियांचे मार्गदर्शन केले. सहभागी नागरिकांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम, कपालभाती आदी योगप्रकारांचा उत्साहाने सराव केला.
यावेळी दिलीप बहिरम यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी एक प्रभावी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक क्षमता वाढते, मानसिक ताणतणाव कमी होतो आणि एकाग्रता वृद्धिंगत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात योग हा निरोगी व आनंदी जीवनाचा आधार बनला आहे.
खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी योगाचे आरोग्यदायी फायदे सांगताना नमूद केले की, नियमित योगामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायू व सांधे बळकट होतात, लठ्ठपणा नियंत्रणात राहतो तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. ध्यान व प्राणायामामुळे मन शांत राहून सकारात्मक विचारसरणी विकसित होते आणि जीवनात संतुलन निर्माण होते.
शिबिराच्या समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले. योगाच्या माध्यमातून निरोगी समाज, सुदृढ कुटुंब व्यवस्था आणि सशक्त राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे आरोग्याविषयी जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून उपस्थितांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
फोटो कॅप्शन :
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष योग शिबिरात योगासने व प्राणायामाचा सराव करताना योग मार्गदर्शक तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी व मंदिराचे सेवेकरी.

