द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा
![]()
द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा
योगासने, सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक; निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले
अमळनेर प्रतिनिधी :
खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळा, अमळनेर येथे २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर करत विद्यार्थिनींना योगाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर व ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस. बी. उपासनी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी विशेष निमंत्रित अतिथी म्हणून योगतज्ज्ञ तथा योगाचार्य रामदेवबाबा यांचे शिष्य श्री. गजानन माळी उपस्थित होते. त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक फायदे विद्यार्थिनींसमोर प्रभावीपणे मांडले. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्ती व्याधीमुक्त, रोगमुक्त, सशक्त, कणखर आणि दीर्घायुषी बनते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, चिंतन, मनन आणि अभ्यासाविषयी आस्था निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी चक्रासन, ताडासन, वज्रासन, शवासन, सूर्यनमस्कार आदी विविध योगासनांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. प्रत्येक योगासनाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि त्यामागील वैज्ञानिक महत्त्व याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत योग दिनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समितीचे चेअरमन श्री. जितेंद्रभाऊ जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस. बी. उपासनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
जागतिक योग दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा व निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा ठरला.


