पल्स पोलिओ व ‘स्टॉप डायरिया’ मोहिमेपूर्वी लासूर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण २८ जूनच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी सज्जता; बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी मार्गदर्शन
1 min read

पल्स पोलिओ व ‘स्टॉप डायरिया’ मोहिमेपूर्वी लासूर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण २८ जूनच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी सज्जता; बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी मार्गदर्शन

Loading

पल्स पोलिओ व ‘स्टॉप डायरिया’ मोहिमेपूर्वी लासूर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

२८ जूनच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी सज्जता; बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी |
चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, लासूर येथे बुधवार, दि. १७ जून २०२६ रोजी आगामी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम तसेच ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन’ संदर्भात पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तक यांना या मोहिमांची सखोल माहिती देत प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

ही कार्यशाळा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या सूचनेनुसार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका तांबेडॉ. मानसी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कार्यशाळेस तालुका आरोग्य सहाय्यक विजय देशमुख आणि तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर यांनी उपस्थित राहून आरोग्य कर्मचाऱ्यांना आगामी २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची माहिती दिली. राज्यभरातील सर्व सरकारी रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी ‘स्टॉप डायरिया’ अभियानाबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालकांमधील कुपोषण आणि अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी १ जूनपासून ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, डायरियाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणादरम्यान सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यात आले तसेच मोहिमेचे महत्त्व पटवून देत ती यशस्वी करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. यानंतर तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर आणि तालुका आरोग्य सहाय्यक विजय देशमुख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दप्तरांची तपासणी करून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यशाळेस वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका तांबे, डॉ. मानसी पाटील, आरोग्य सहाय्यिका लता अलकारी, आरोग्य सहाय्यक विनोद पवार, सर्व आरोग्य सेवक-सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गट प्रवर्तक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लासूरचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *